जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडच्या संघाकडून दणदणीत पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात मोहम्मद शमी वगळता सर्व भारतीय खेळाडूंची कामगिरी निराशाजनक होती. त्यातही, भारतीय संघाचा एक खेळाडू होता जो सामन्यातील सर्वात अपयशी खेळाडू ठरला. त्या खेळाडूला संपूर्ण सामन्यात ना बळी मिळवता आला, ना फलंदाजीत तो एक धावा बनवू शकला.
गोलंदाजीत ठरला सुपरफ्लॉप
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जगातील क्रमांक एकचा वेगवान गोलंदाज मानला जातो. आपल्या भात्यातील धारदार यॉर्कर व टप्पा धरून गोलंदाजी करण्याच्या कौशल्यामुळे तो जगभरातील बड्या फलंदाजांना चकवतो.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात या वेगवान गोलंदाजाने भारतीय संघाच्या गोलंदाजीच्या आक्रमणाचे नेतृत्व केले. मात्र, तो ही भूमिका यशस्वीरित्या बजावू शकला नाही.
पहिल्या डावात बुमराहने एकूण २६ षटके गोलंदाजी केली. ज्यामध्ये त्याच्या गोलंदाजीवर विरोधी फलंदाजांनी ५७ धावा केल्या. बुमराहला या डावात एकही बळी मिळाला नाही. त्याचबरोबर त्याने दुसऱ्या डावात १०.४ षटके केली. ज्यामध्ये त्याने एकूण ३५ धावा दिल्या आणि या डावातही या गोलंदाजाला एकही बळी मिळवता आला नाही. दुसऱ्या डावात त्याच्या गोलंदाजीवर चेतेश्वर पुजाराने रॉस टेलरचा एक झेल सोडला होता.
फलंदाजीत नाही खोलू शकला खाते
ज्याप्रकारे बुमराह गोलंदाजीमध्ये चमक दाखवू शकला नाही, त्याप्रकारे फलंदाजीतही त्याला दोन्ही डावात मिळून एकही धाव करता आली नाही. पहिल्या डावात कायले जेमिसनने त्याला पहिल्या चेंडूवर पायचीत पकडले. तर, दुसऱ्या डावामध्ये टिम साऊदीच्या गोलंदाजीवर तो पहिल्या स्लिपमध्ये टॉम लॅथमच्या हाती झेल देऊन माघारी परतला. न्यूझीलंडच्या डावाच्या अखेरीस त्याने केन विलियम्सनचा एक झेल देखील सोडला होता.
या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाला जसप्रीत बुमराहकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, तो यामध्ये सपशेल अपयशी ठरला व भारताच्या पराभवाचे मुख्य कारण बनला.
महत्त्वाच्या बातम्या –
राष्ट्रीय संघाऐवजी आयपीएलची निवड करणार्या खेळाडूंवर भडकला वॉर्न, ‘ही’ कारवाई करण्याची मागणी
आयपीएल २०२१ उर्वरित हंगामापूर्वी युएई सरकारच्या ‘या’ नियमामुळे बीसीसीआय आणि फ्रँचायझींना मोठा फटका
कौतुकास्पद! गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या ३ वर्षीय चिमुकलीच्या मदतीला धावले दोन भारतीय धुरंधर