इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा हंगाम सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. अशातच मुंबई इंडियन्सचा कॅम्पमधून एक मोठी माहिती समोर येत आहे. त्यांचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये (सीएई) दाखल झाला आहे. तो तेथे का गेला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र तो सध्यातरी मुंबई संघाच्या शिबिरात सामील झालेला नाही.
मागील आठवड्यात मुंबईचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने यांनी माहिती दिली की, भारताच्या टी२० विश्वचषक विजेत्या खेळाडूंना शिबिरातून काही दिवस विश्रांती देण्यात आली आहे. भारताने ८ मार्चला टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत तिसरा चषक जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली होती.
काही रिपोर्ट्सनुसार, बुमराह २०२६ च्या हंगामासाठी मुंबईच्या शिबिरात दाखल झालेला नाही. आता तो बेंगलोरच्या सीओईमध्ये गेला आहे. तो तेथे दुखापतीमुळे गेला का याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यामुळे तो वेळेत मुंबई संघाशी जोडला जाणार का हे अद्याप सांगणे कठीण आहे.
टी२० विश्वचषकानंतर मुंबईकडून खेळणारे अनेक खेळाडू त्यांच्या देशात परतले असून ते लवकरच संघाशी जोडले जाणार असे जयवर्धने यांनी सांगितले आहे. त्यांनी मागील आठवड्यात एमआय ज्युनियर हंगामाच्या समारोप समारंभादरम्यान एमआयजी क्रिकेट क्लब मैदानावर सांगितले, “परदेशातील खेळाडूही मायदेशी परतले आहेत आणि त्यानंतर ते आमच्या संघात सामील होतील. पण पहिल्या सामन्यापूर्वी ते आमच्यासोबत एक आठवडा चांगला सराव करतील.”
बुमराहने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरूवात मुंबईसोबत केली आहे. तो २०१३ पासून संघाचा महत्वाचा खेळाडू राहिला असून त्याने मुंबईला ५ आयपीएल विजेेतेपद जिंकण्यात मदत केली आहे.
आयपीएल २०२६ मध्ये मुंबईचा पहिला सामना २९ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.






