ऍडलेड। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात ऍडलेड ओव्हल स्टेडियमवर ७२ व्या ऍशेस मालिकेतील दुसरा सामना झाला. दिवस-रात्र स्वरुपातील या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रूट याने अर्धशतक केले. यासह त्याने काही मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
रुटने पहिल्या डावात डेविड मलानसह १३८ धावांची भागीदारी करताना ६२ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ११६ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार मारले. यासह त्याने यावर्षी कसोटीत १६०० धावा पूर्ण करण्याचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे त्याने एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे.
रुटच्या यावर्षी १४ कसोटी सामन्यांत ६४.२४ च्या सरासरीने १६०६ धावा झाल्या असून यामध्ये त्याच्या ६ शतकांचा आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.
एका वर्षात कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद युसूफ यांच्या नावावर आहे. त्यांनी २००६ साली १७८८ धावा केल्या होत्या. त्यांच्यापाठोपाठ सर विवियन रिचर्ड्स आणि ग्रॅमी स्मिथ आहे. रिचर्ड्स यांनी १९७६ साली १७१० धावा केल्या होत्या आणि स्मिथने २००८ साली १६५६ धावा केल्या होत्या. या यादीत रुटने मायकल क्लार्क याला मागे टाकले आहे. त्याने २०१२ साली १५५६ धावा केल्या होत्या.
याशिवाय रुट एका वर्षात कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत त्याने मायकल क्लार्कलाच मागे टाकले आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर ग्रॅमी स्मिथ आहे.
कसोटीत एका वर्षात सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू
१७८८ धावा – मोहम्मद युसूफ, २००६
१७१० धावा – विवियन रिचर्ड्स, १९७६
१६५६ धावा – ग्रॅमी स्मिथ, २००८
१६०६ धावा – जो रुट, २०२१
१५९५ धावा – मायकल क्लार्क, २०१२
कसोटीत एका वर्षात सर्वाधिक धावा करणारे कर्णधार
१६५६ धावा – ग्रॅमी स्मिथ, २००८
१६०१ धावा – जो रुट, २०२१
१५९५ धावा – मायकल क्लार्क, १०१२
१५४४ धावा – रिकी पाँटिंग, २००५
१३८१ धावा – बॉब सिम्पसन, १९६४
आता नजर स्मिथच्या विक्रमावर
रुटला अजून ऍडलेड येथे दुसऱ्या डावात फलंदाजीची संधी मिळणार आहे. तसेच ऍशेस मालिकेतील तिसरा सामना याचवर्षी २६ ते ३० डिसेंबर दरम्यान होणार आहे. त्यामुळे रुटला ग्रॅमी स्मिथला एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत, तसेच कसोटीत एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या कर्णधारांच्या यादीत मागे टाकण्याची संधी असणार आहे. स्मिथला मागे टाकण्यासाठी रुटला ५१ धावांची गरज आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विराट विरुद्ध गांगुली वादाचे पडसाद सोशल मीडियावरही, #WorldStandsWithKohli हॅशटॅग ट्रेंड
तब्बल ५०५ मिनिटे फलंदाजी अन् ९९ धावांवर बाद, वाचा गावसकरांच्या ‘हिरो’च्या खेळीबद्दल सविस्तर
अश्विन भलताच चिडला होता; तर द्रविड सगळ्यांची घेत होता फिरकी, पाहा टीम इंडियाचं अफलातून फूटबाॅल सेशन