इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रुट मागच्या काही कसोटी सामन्यांमध्ये सुमार प्रदर्शन करताना दिसला आहे. भारताविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावांमध्ये त्याची बॅट शांत होती. याच पार्श्वभूमीवर त्याच्या फॉर्मबाबत प्रश्न देखील उपस्थित होत आहे. रुटला फलंदाजी करताना नक्की काय अडचण येत आहे, याविषयी सतत बोलले जात आहे. अशातच इंग्लंडचा माजी दिग्गज कर्णधार ऍलिस्टर कूक याने खास प्रतिक्रिया दिली.
इंग्लंड संघ (England Team) मागच्या एका वर्षापेक्षा अधिक काळापासून बॅझबॉल क्रिकेट खेळत आहे. ब्रँडन मॅक्युलम इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर त्याने संघाला कसोटी क्रिकेटमध्ये आक्रमक खेळी करण्यासाठी मार्गदर्शन केले. प्रशिक्षक मँक्युकम आणि कर्णधार बेन स्टोक्स बॅझबॉल क्रिकेटच्या जोरावर मागच्या वर्षभरात अनेक महत्वाच्या मालिका आणि सामने जिंकले आहेत. संघाच्या विजयाची टक्केवारी देखील यादरम्यानच्या काळात वाढल्याचे दिसले. पण ऍलिस्टर कूक (Alaister Cook) याच्या मते कसोटी स्पेशलिस्ट जो रुट (Joe Root) बॅझबॉल क्रिकेट खेळण्यासाठी अद्याप तयार झाला नाहीये. कुकला असे वाटते की, बॅझबॉल क्रिकेट खेळण्याच्या प्रयत्नात रुट आपली मुळ शैली सोडत आहे.
जो रुट कसोटी क्रिकेटमधील आपल्या सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी ओळखला जातो. पण मागच्या काही सामन्यांमध्ये त्याला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाहीये. रुटने आपले शेवटचे कसोटी शतक जानेवारी 2023 मध्ये, म्हणजेच जवळपास एका वर्षापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले होते. मागच्या वर्षभरता त्याने दोन अर्धशतके केली, पण शतकापर्यंत पोहोचला नाही. कूकच्या मते हा बॅझबॉल क्रिकेटचा रुटवर झालेला वाईट परिणाम आहे.
‘टीएनटी स्पोर्ट्स’ला दिलेल्या मुलाखतीत ऍलिस्टर कूक म्हणाला, “तो (जो रुट) क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये इंग्लंडचा सर्वश्रेष्ठ फलंदाजआ हे. पण बॅझबॉलच्या काळात तो कधी-कधी संघर्ष करताना दिसतो. तो संघातील इतर सर्वांना आक्रमक फटके मारताना पाहतो, जे त्यांच्या शैलीनुसार आहे. रुटने 11,500 कसोटी धावा केल्या आहेत आणि तो अप्रतिम आहे. पण बेन (स्टोक्स) आणि ब्रँडन (मॅक्युलम) जे करत आहे, त्यात फिट होण्यासाठी तो अतिउत्साही आहे. आक्रमण आणि बचावपूर्ण खेळीतील संतुलन त्याला जमत नाहीये.”
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टणच्या वायझॅक स्टेडियमवर झाला. भारताने 106 धावांनी इंग्लंडला पराभूत केले. या सामन्यातील दुसऱ्या डावात रुटने 9 चेंडूत 16 धावा करून विकेट गमावली. कूकच्या मते रुट एवढ्या गतीने धावा करत नाही. (Joe Root is forgetting his game, because of baseball cricket, said Alaister Cook)
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटजगतात सुरू झाला नवा वाद, रोहितकडून कर्णधारपद काढून घेणं चुकीचं! पत्नी रितिकाची पहिली प्रतिक्रिया
धक्कादायक! कॅरेबियन खेळाडूला दाखवला बंदुकीचा धाक, एसए20 लीगमध्ये खेळाडूंच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न