गॉल। श्रीलंका विरुद्ध इंग्लंड संघात सध्या गॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेचा दुसरा डाव ३५.५ षटकात १२६ धावांवर संपुष्टात आला. या डावात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने शेवटच्या दोन विकेट्स घेतल्या. याबरोबरच त्याने एक खास विक्रम केला आहे.
रुटने या डावात १.५ षटके म्हणजे ११ चेंडू टाकले. यात ११ चेंडूत त्याने एकही धाव न देता लसिथ एम्बुलडेनिया आणि असिथा फर्नांडो यांना बाद केले. त्यामुळे जो रुट असा पहिलाच खेळाडू ठरला आहे, ज्याने कसोटी सामन्यात एकही धाव न देता २ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
यापूर्वी रुटने २०१६ साली पाकिस्तानविरुद्ध मँचेस्टर येथे खेळताना एकही धाव न देता १ विकेट घेतली होती. त्यामुळे तो दोन वेगळ्या कसोटी सामन्यात एकही धाव न देता विकेट्स घेणाराही पहिलाच खेळाडू ठरला आहे.
फलंदाजीतही कमाल
विशेष म्हणजे रुट हा पार्टटाईम (कामचलाऊ) गोलंदाज आहे. तसेच रुटने श्रीलंकेविरुद्धच्या या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत फलंदाजीतही कमाल केली आहे. त्याने पहिल्या कसोटी सामन्यात २२८ धावांची खेळी केली आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावातही त्याने १८६ धावांची खेळी केली आहे.
श्रीलंका विरुद्ध इंग्लंड सामन्यात रंगत –
सध्या गॉलमध्ये सुरु असलेल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने पहिल्या डावात अँजेलो मॅथ्यूजच्या(११०) शतकी खेळीच्या आणि दिनेश चंडिमल(५२), निरोशान डिकवेल्ला(९२) आणि दिलरुवान परेरा(६२) यांच्या अर्धशतकांमुळे ३८१ धावांचा डोंगर उभारला. या डावात इंग्लंडकडून जेम्स अँडरसनने सर्वाधिक ६ विकेट्स घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात खराब झाली, मात्र कर्णधार जो रुटने दिडशतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. त्याने ३०९ चेंडूत १८६ धावा केल्या. त्याला ५५ धावा करत जोस बटलरने चांगली साथ दिली. मात्र तरीही इंग्लंडला ३७ धावांची पिछाडी स्विकारावी लागली. इंग्लंडचा पहिला डाव ३४४ धावांवर संपुष्टात आला.
यानंतर मात्र, इंग्लंडच्या फिरकीपटूंनी शानदार कामगिरी करताना श्रीलंकेला १२६ धावांवरच रोखले. त्यामुळे श्रीलंकेने ३७ धावांच्या आघाडीसह इंग्लंडसमोर १६४ धावांचे आव्हान ठेवले आहे.
याआव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने सलामीवीर जॅक क्राऊले(१३) आणि जॉनी बेअरस्टोची(२९) विकेट गमावली आहे. या दोघांनाही लसिथ एम्बुलडेनियाने बाद केले. तसेच कर्णधार रुट देखील ११ धावांवर रमेश मेंडिसच्या गोलंदाजीवर बाद बाद झाला आहे. तर एम्बुडेनियाने डॅनिएल लॉरेन्सलाही बाद केले आहे. पण असे असले तरी इंग्लंडचा डाव सलामीवीर डॉमनिक सिब्ले आणि जॉस बटलरने सांभाळला. या दोघांनीही अर्धशतकी भागीदारी करत इंग्लंडला विजयाच्या जवळ नेले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
शाकिब अल हसनची अनोख्या विक्रमाला गवसणी, ‘ही’ कामगिरी करणारा जगातला पहिला क्रिकेटपटू
दोन हजाराहून अधिक कसोटी सामने झाले, पण ‘असा’ विक्रम पहिल्यांदाच झाला