बांग्लादेश आणि वेस्ट इंडिज संघात सध्या तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येत आहे. ही मालिका बांग्लादेशमध्येच होत आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने बांग्लादेशने जिंकले असून तिसरा सामना आज चत्तोग्रामच्या मैदानावर सुरु आहे.
या सामन्यात फलंदाजी करताना बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. शाकिब अल हसनने मायदेशातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात ६००० धावा आणि ३०० बळी घेण्याचा पराक्रम केला. असे करणारा शाकिब जगभरातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
अर्धशतक झळकवत केला विक्रम
शाकिब अल हसनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय पुनरागमन केले. मागील वर्षभरापासून त्याच्यावर मॅच फिक्सिंगबाबत विचारणा झाल्याची माहिती लपवण्याप्रकरणी बंदी घालण्यात आली होती. बंदीचा कालावधी दोन वर्षाचा निश्चित करण्यात आला होता, पण नंतर तो कमी करून एक वर्षाचा करण्यात आला. मात्र शाकिब अल हसनने आपल्या बंदीनंतरही सर्वोत्तम कामगिरीची भूक कमी न झाल्याचे सिद्ध केले.
शाकिबने पुनरागमनानंतर पहिल्या दोन्ही सामन्यात दमदार कामगिरी केली. त्याने पहिल्या दोन सामन्यात गोलंदाजी करताना एकूण सहा बळी घेतले. तर फलंदाजी करतांना अनुक्रमे १९ आणि नाबाद ४३ धावांची खेळी साकारली. त्याला पहिल्या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देखील मिळाला होता. हाच फॉर्म कायम राखत त्याने आजच्या तिसऱ्या सामन्यात त्याने ५१ धावांची खेळी केली. याच अर्धशतकादरम्यान त्याने बांग्लादेशमधील सामन्यात ६००० धावांचा टप्पा ओलांडला. आता मायदेशात ६००० धावा आणि ३०० बळी नावावर असणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे.
दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पहिले दोन सामने जिंकून बांग्लादेशने याआधीच मालिका खिशात घातली आहे. मात्र या तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा युवा संघ दौऱ्यातील पहिला विजय नोंदवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र सद्यस्थितीत तेही विंडीजसाठी अवघड असल्याचे चित्र आहे. बांग्लादेशने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ६ बाद २९७ धावा उभारल्या असून त्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची ३ बाद ६१ अशी नाजूक अवस्था झाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा जेसन मोहम्मद ६ तर निक्रूमाह बोनर २३ धावांवर खेळत होते.
महत्वाच्या बातम्या:
ती घटना घडली अन् बाऊंसरची भीती पळाली, शुबमन गिलने केला खुलासा
कर्णधार कोणीही असो, आमची इच्छा एकच, विराटच्या नेतृत्त्वाशी तुलना केल्याने रहाणेचे मोठे भाष्य
पंत आणि साहामध्ये यष्टीरक्षणासाठी टक्कर? वृद्धिमान साहा म्हणतो, शेवटचा निर्णय संघ






