देशातील शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आगीसारखा भडकत चालला आहे. त्यातही भारताचा महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने शेतकरी आंदोलनावर केलेल्या ट्विटमुळे तो मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहे. अशात सचिनचे हे ट्विट दक्षिण आफ्रिकाचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्स याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर आपोआप पोस्ट झाले आहे. यामुळे रोड्सने आपले ट्विटर अकाउंट हॅक झाले असल्याचे सांगितले आहे.
झाले असे की, सचिनने ३ फेब्रुवारी रोजी शेतकरी आंदोलनावर ट्विट करत लिहिले होते की, ‘भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाऊ शकत नाही. बाहेरचे लोक प्रेक्षक असू शकतात परंतु, यात सहभागी होऊ शकत नाहीत. भारतीयांना भारत देश माहित आहे आणि त्यांनी भारतासाठी निर्णय घ्यावा. चला एक राष्ट्र म्हणून एकजूट राहूया.’
सचिनच्या या ट्विटनंतर काही वेळातच अगदी सारखेच ट्विट रोड्सच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट झाल्याचे निदर्शनास आले. आश्चर्याची बाब अशी की, रोड्सने स्वत: हे ट्विट केले नसून आपोआपच त्याच्या अकाउंटवर हे ट्विट पोस्ट झाले आहे. रोड्सने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे.
त्याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सचिनचे शेतकरी आंदोलन मुद्द्यावरील ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. सोबतच आपल्या ट्विटर अकाउंटवर करण्यात आलेल्या सचिनच्या ट्विटचा स्क्रिनशॉटही जोडला आहे. या पोस्टला कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, ‘कदाचित माझे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. यापुर्वी असे कधीही झाले नव्हते.’
रोड्सच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी त्याला आरोपीला शोधण्याचे पर्यायचेही सांगितले आहेत.
जॉन्टी रोड्सची क्रिकेट कारकिर्द
जॉन्टी रोड्स याला क्रिकेटजगतातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये गणले जाते. या ५१ वर्षीय क्रिकेटपटूने क्रिकेट कारकिर्दीत २४५ वनडे सामने खेळले आहेत. यात २ शतकांच्या मदतीने ५९३५ धावा केल्या आहेत. तसेच ५२ कसोटी सामने खेळताना २५३२ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ शतकांचा समावेश आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोड्स यांनी प्रशिक्षणाचा मार्ग अवलंबला. ते आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक होते. गतवर्षी त्यांची किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
गुगल गंडल! ६० वर्षीय रवी शास्त्रीचं गुगलवरील वय चक्क दुप्पट, खोट वाटतंय तर सर्च करुन पाहा
सलामीचा फलंदाज असणारा श्रीसंत ‘असा’ झाला वेगवान गोलंदाज
भारतीय संघाच्या व्यस्त वेळापत्रकाबाबत रवी शास्त्री यांनी केले भाष्य; ‘या’ गोष्टीची केली मागणी