मुंबई । कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. सर्वच देशातील खेळाडू आयपीएल 2020 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र अजूनही याबाबत कोणताच निर्णय झाला नाही. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि जगातला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जाणारा जॉन्टी रोड्स याने आयपीएलबाबत मोठे विधान केले आहे.
यंदाच्या वर्षात मार्च महिन्यात आयपीएलचे नियोजन करण्यात येणार होते. आता वर्षा अखेर आयपीएलचे नियोजन करण्यावर भर दिला जात आहे. जॉन्टी रोड्सच्या मते, क्रिकेटच्या कॅलेंडरमध्ये आयपीएल शिवाय अर्थ नाही.
जॉन्टी रोड्स म्हणाला, “आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आयपीएल होणे गरजेचे आहे. या लीगमध्ये विदेशातून येणाऱ्या खेळाडूंना क्वारंटाइन करू शकतो. त्यांची टेस्ट घेतली जाऊ शकते. मात्र आयपीएल पाहण्यासाठी केवळ भारतीय फॅन्सला मुभा असावी. टी 20 विश्वचषकाचे नियोजन करणे अवघड दिसत आहे. ऑलिम्पिक सारख्या स्पर्धा स्थगित करण्यात आले आहे. सध्याची परिस्थिती पाहता विश्वचषक होणे अवघड आहे. आयपीएल आर्थिक स्थिती आणि खेळाडूंच्या भवितव्यासाठी होणे गरजेचे आहे.”
“जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू या लीगमध्ये खेळत असतात. विना आयपीएल क्रिकेटच्या कॅलेंडरला काहीच अर्थ नाही. मी आशा करतो की, या वर्षाच्या शेवटपर्यंत सर्व परिस्थिती पूर्वीसारखी होईल आणि आपण आयपीएल पुन्हा एकदा पाहू,” असे जॉन्टी रोड्स म्हणाला.
गरज पडल्यास आयपीएल भारताबाहेर आयोजित केला जाऊ शकतो, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.