राजस्थान रॉयल्सचा धडाकेबाज सलामीवीर जोस बटलर यानं संघाला मोठा धक्का दिला आहे. बटलर आयपीएल 2024 मध्ये राजस्थानसाठी उर्वरित सामने खेळणार नाही. तो मायदेशी म्हणजे इंग्लंडला रवाना झाला आहे.
लवकरच पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात 4 टी20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेमध्ये खेळण्यासाठी बटलरनं आयपीएल 2024 मधून आपलं नाव काढून घेतलं. 22 मे ते 30 मे दरम्यान इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 4 टी20 सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर टी20 विश्वचषकाला सुरुवात होईल. विश्वचषकात जोस बटलर इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे.
राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीनं त्यांच्या अधिकृत ‘X’ खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये जोस बटलर हॉटेल सोडताना दिसत आहे. त्यानं आपल्या सहकाऱ्यांना मिठी मारली आणि कारमध्ये बसल्यानंतर राजस्थान रॉयल्सला ट्रॉफी जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. बटलरच्या जाण्याचा हा व्हिडिओ भावूक करणारा, ज्याच्या बॅकग्राऊंडमध्ये ‘मैनु विदा करो’ हे गाणं वाजत आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये, “प्रत्येकजण ‘जोस भाई’ला खूप मिस करेल”, असं लिहिलं आहे.
जोस बटलरनं आयपीएलच्या या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी शानदार कामगिरी केली आहे. त्यानं खेळलेल्या 11 सामन्यांमध्ये 39.89 ची सरासरी आणि 140.78 च्या स्ट्राईक रेटनं 359 धावा केल्या. या दरम्यान त्यानं दोन शतकही ठोकली.
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात मोईन अली, जॉनी बेअरस्टो, सॅम करन, विल जॅक्स, फिल सॉल्ट आणि रीस टॉपली यांचाही समावेश आहे. त्यामुळे हे खेळाडूही या वीकेंडला इंग्लंडला परतू शकतात. बेअरस्टो आणि करन सध्या पंजाब किंग्जकडून खेळत आहेत. परंतु त्यांचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे, विल जॅक्स आणि रीस टॉपले आरसीबीकडून आहेत. तर फिल सॉल्ट आणि मोईन अली अनुक्रमे केकेआर आणि सीएसकेकडून आहेत. केकेआरचा संघ प्लेऑफसाठी पात्र झाला असून, आरसीबी आणि सीएसके अजूनही शर्यतीत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ना चेन्नई ना मुंबई; ही आहे आयपीएलमध्ये एका मैदानावर सर्वाधिक सामने जिंकणारी टीम
टी20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा घेऊ शकतो क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमधून निवृत्ती, जाणून घ्या कारण
धोनीनं रविवारी चेपॉकमध्ये शेवटचा आयपीएल सामना खेळला? ‘गार्ड ऑफ ऑनर’ नंतर निवृत्तीच्या चर्चांना वेग