आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 13वा सामना खूपच रोमांचकरीत्या पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने गतविजेत्या इंग्लंड संघाचा 69 धावांनी दारुण पराभव केला. हा इंग्लंडचा स्पर्धेतील दुसरा पराभव होता. उद्घाटनाच्या सामन्यात त्यांना न्यूझीलंड संघाने 9 विकेट्सने नमवले होते. अशात दुसऱ्या पराभवानंतर कर्णधार जोस बटलर पुरता खचून गेला. बटलरने पराभवानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, त्यांना या पराभवामुळे वाईट वाटत आहे.
सामन्यानंतर बटलरची प्रतिक्रिया
या सामन्यानंतर बोलताना बटलर म्हणाला की, या पराभवानंतर धडा घेण्याची गरज आहे आणि प्रदर्शनाचाही विचार करण्याची गरज आहे. यावेळी त्याने विरोधी संघाच्या शानदार प्रदर्शनाचेही कौतुक केले. तो म्हणाला, “हा खूपच निराशाजनक पराभव आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर आम्ही गोलंदाजी केली आणि खूप जास्तच धावा खर्च झाल्या. याचे सर्व श्रेय अफगाणिस्तानला जाते. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आमच्यापेक्षा चांगले प्रदर्शन केले.”
तो पुढे म्हणाला, “हा पराभव पचवणे खूपच कठीण आहे. मात्र, अफगाणिस्तानचे अभिनंदन. होय, मला वाटते की, आम्ही या पराभवांनी दु:खी झालो पाहिजे. आम्हाला यावर नियंत्रण मिळवण्याऐवजी यावर विचार करण्याची गरज आहे.”
सामन्याचा आढावा
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी अफगाणिस्तानने रहमानुल्लाह गुरबाज (80) आणि इकराम अलिखिल (58) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 49.5 षटकात सर्व विकेट्स गमावत 284 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडचा डाव 40.3 षटकात 215 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे त्यांना सामन्यात 69 धावांनी पराभव पत्करावा लागला.
पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध
बटलर असेही म्हणाला की, त्याला आशा होती की, दुसऱ्या डावात दव येतील, जे आले नाहीत. अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर इंग्लंड आपले लक्ष दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यावर केंद्रित करेल. दोन्ही संघ 21 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर भिडणार आहेत. (jos buttler statement after defeat by afghanistan in world cup 2023 13th match)
हेही वाचा-
ऑस्ट्रेलिया की श्रीलंका? कोण खोलणार विश्वचषकात विजयाचे खाते
मोहम्मद रिझवानला पाहताच गर्दीला चढला जोर, अहमदाबादमध्ये जय श्रीराम-जय श्रीराम नारेबाजी