यूएई आणि ओमानमधील टी२० विश्वचषक स्पर्धेचा थरार संपल्यानंतर भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये टी -२० मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना १७ नोव्हेंबर रोजी पार पडला होता. ज्यामध्ये भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत ५ गडी राखून विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. तसेच मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात स्टेडियम पॅक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
झारखंड प्रदेश क्रिकेट संघाचे सचिव संजय सहाय यांनी म्हटले की, “राज्य सरकारने १०० टक्के उपस्थितीची परवानगी दिली आहे आणि आम्हाला आशा आहे की, भारतात दीर्घकाळानंतर स्टेडियम पूर्ण भरेल. तसेच गॅलरीमध्ये खाण्यापिण्याचीही व्यवस्था असेल. हळू हळू गोष्टी सामान्य होत आहेत. लोक दोन वर्षांच्या लॉकडाऊनमुळे कंटाळले आहेत. त्यामुळे या सामन्याची ते आतुरतेने वाट पाहत आहेत. पुन्हा एकदा लोक रस्त्यावर दिसणार आहेत.”
स्टेडियममध्ये नियमांचे देखील काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. याबाबत बोलताना ते म्हटले की, “मैदानात येण्यापूर्वी प्रेक्षकांची चौकशी केली जाईल. कोरोनाचे २ डोस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा ४८ तासातील निगेटिव्ह आरटी पीसीआर अहवाल दाखवावा लागेल.” या स्टेडियमच्या क्षमतेबद्दल बोलायचं झालं तर, या स्टेडियममध्ये ३९००० प्रेक्षक सामना पाहू शकतात. या सामन्यासाठीचे ९०० पासून ते ९००० पर्यंतचे सर्व तिकीट विकले गेले आहे. संजय सहाय म्हणाले की, “आमच्याकडे ८० तिकिटे शिल्लक आहेत जी आपत्कालीन कोट्यासाठी आहेत. ते विकले जाणार नाहीत.”
एमएस धोनीने रांचीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करून दिली. अनेकांना असेही वाटत आहे की, एमएस धोनी हा सामना पाहण्यासाठी येऊ शकतो. त्यामुळे त्याला पाहण्यासाठी देखील प्रचंड गर्दी होऊ शकते. याबाबत बोलताना संजय सहाय यांनी म्हटले की, “धोनी इथेच आहे आणि आज कोर्टवर टेनिस खेळला. तो सामना पाहायला येईल की नाही हे सांगता येत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या –
केव्हा, कुठे आणि कधी पाहू शकाल भारत-न्यूझीलंड दुसरा टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर
‘ती आली आहे का?’ लाईव्ह सामन्यात दिपक चाहरचा स्टँडमध्ये बसलेल्या बहिणीला प्रश्न, व्हिडिओ व्हायरल