ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज टिम पेनने कसोटी कर्णधारपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी याबद्दल माहिती दिली आहे. तीन आठवड्यांवर ऍशेस मालिका आलेली असताना पेनने घेतलेल्या या तडकाफडकी निर्णयाचा अनेकांना धक्का बसला आहे. पण, त्याचे ४ वर्षांपूर्वीच्या एका लाजिरवाण्या प्रकरणात नाव आल्याने हा निर्णय घेतल्याचे त्याने सांगितले आहे.
साल २०१७ मध्ये टास्मानिया क्रिकेटमधील एका महिला कर्मचारीला अश्लील फोटो आणि मेसेज केल्याचा आरोप टिम पेनवर झाला आहे. आता त्याने त्या प्रकरणाबाबत सर्वांची माफी मागत कसोटी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खरंतर काही दिवसांपूर्वीच आगामी ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा करण्यात आली होती. या संघाचे कर्णधारपद टिम पेनला देण्यात आले होते.
त्यामुळे आता उपकर्णधार पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार बनण्याची दाट शक्यता आहे. येत्या ८ डिसेंबरपासून मानाच्या ऍशेस मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत पॅट कमिन्स ऑस्ट्रेलियाचे नेतृत्त्व करण्यास सज्ज असेल. जर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने कमिन्सकडे कर्णधारपद दिले, तर तो गेल्या ६५ वर्षांतील पहिलाच वेगवान गोलंदाज असेल, जो ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करेल. तसेच ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे नेतृत्त्व करणारा ४७ वा खेळाडू ठरेल.
पेनने मागितली माफी
पेनने कर्णधारपद सोडताना सांगितले आहे की, ‘मी आज ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हा नक्कीच अवघड निर्णय होता. पण माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि क्रिकेटसाठी हा निर्णय योग्य आहे. माझ्या निर्णयामागे ४ वर्षांपूर्वीचे प्रकरण आहे. मी तात्कालीन महिला सहकारीला मेसेज पाठवण्याच्या प्रकरणात सहभागी होतो. त्यावेळी, हे मेसेज क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या इंटिग्रिटी युनिटच्या तपासणीचा विषय होता, ज्यामध्ये मी पूर्णपणे आणि उघडपणे सहकार्य केले.’
तसेच त्याने सांगितले की, ‘त्या तपासणीत आणि क्रिकेट टास्मानिया एचआर तपासणीत क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या आचारसंहितेचा कोणताही भंग झाल्याचे आढळून आले नाही. जरी मी या प्रकरणात निर्दोष आढळलो असलो तरी, या घटनेचा त्यावेळी आणि आजही मला मनापासून पश्चाताप होतो. मी माझ्या पत्नीशी आणि कुटुंबाशी बोललो आणि मी त्यांच्या क्षमा आणि पाठिंब्यासाठी मी खूप आभारी आहे. आम्हाला वाटले ही की ही घटना मागे पडेल आणि मी गेल्या तीन-चार वर्शांपासून संघावर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले होते.’
त्याबरोबर त्याने सांगितले की त्याला नुकतेच समजले की ते मेसेज सर्वांसमोर आले आहेत. याचा विचार केल्यास, २०१७ मधील माझी कृती ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कर्णधार म्हणून आणि समाजाच्या दृष्टीने योग्य नाही. मी माझ्या पत्नीला, कुटुंबाला आणि अन्य लोकांना दुखावल्याबद्दल मनापासून माफी मागतो. खेळाच्या प्रतिष्ठेबाबत झालेल्या नुकसानाबद्दल मी खेद व्यक्त करतो.’
पेनने पुढे म्हटले की, याच प्रकरणामुळे कर्णधारपद सोडण्याचा त्याचा निर्णय योग्य आहे. ‘मला आगामी ऍशेस मालिकेपूर्वी संघासाठी कोणतीही अडचण निर्माण करायची नव्हती. मला ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या कर्णधाराची भूमीका आवडली होती,हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता. मी माझ्या संघसहकाऱ्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञ आहे आणि आम्ही एकत्र जे यश मिळवले, त्याबद्दल अभिमान आहे,’ असेही पेन म्हणाला.
याशिवाय पेनने सर्व क्रिकेट चाहत्यांची आणि क्रिकेटविश्वाची माफी मागितली आहे. तसेच त्याने त्याच्या कुटुंबाचे पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत.
याशिवाय त्याने सांगितले की तो खेळाडू म्हणून यापुढे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करत राहिल.
महत्त्वाच्या बातम्या –
एकेकाळी गाजलेल्या ३ क्रिकेट स्पर्धा, ज्यांचा आज सर्वांना पडलाय विसर