कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला. या सामन्यात आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी अप्रतिम गोलंदाजी करूनसुद्धा हा सामना अनिर्णीत राहिला. एकवेळ असे वाटू लागले होते की, भारतीय संघ हा सामना जिंकणार. परंतु, शेवटी न्यूझीलंड संघाकडून रचीन रवींद्र आणि एजाज पटेल यांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यामुळे न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन भलताच खुश झाला आहे. तसेच सामना झाल्यानंतर त्याने खेळाडूंचे कौतुक देखील केले.
सामना झाल्यानंतर केन विलियमसनने खेळाडूंचे कौतुक करत म्हटले की, “शेवटपर्यंत तिन्ही निकाल लागू शकत होते. आम्ही दिवसभर फलंदाजी केली आणि जोरदार संघर्ष केला. हा रचीन, एजाज आणि समरवीलसाठी एक चांगला अनुभव होता. तसेच इथे स्टेडियममध्ये चाहत्यांनी हजेरी लावली होती, हे पाहणे देखील सुखद होते.”
तसेच न्यूझीलंड संघातील गोलंदाजांचे कौतुक करत केन विलियमसन म्हणाला की, “आमचे गोलंदाज टीम साउदी आणि काइल जेमिसन यांनी चांगली गोलंदाजी केली. मोठ्या स्पेल टाकण्याचा हा एक अविश्वसनीय प्रयत्न होता. आम्हाला माहीत आहे की, हा भारतीय संघ खूप मजबूत संघ आहे. एकंदरीत हा सामना खूप चांगला रंगला. आम्हाला मुंबईच्या खेळपट्टीसाठी विशेष तयारी करावी लागणार आहे.”
न्यूझीलंडच्या शेवटच्या जोडीमुळे सामना झाला अनिर्णीत
भारतीय संघातील फिरकीपटू आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हे जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांपैकी एक आहेत. भारतीय खेळपट्टीवर हे दोघेही गोलंदाज आणखी घातक गोलंदाजी करत असतात. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी केवळ एक फलंदाज बाद करायचा होता. परंतु, भारतीय गोलंदाज असे करण्यास अपयशी ठरले.
न्यूझीलंड संघाकडून रचीन रवींद्रने ९१ चेंडूंमध्ये १८ धावांची खेळी केली तर एजाज पटेलने २३ चेंडूंमध्ये २ धावा केल्या. तसेच समरवीलने ११० चेंडूंमध्ये ३६ धावा करत सामना भारतीय संघाकडून खेचून घेतला.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई कसोटीत विराट कोणाच्या जागेवर खेळणार? अजिंक्य रहाणे म्हणतोय…
राहुल तेवतिया अडकला लग्नाच्या बेडीत, नव्या जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोहोचली ‘ही’ क्रिकेटर मंडळी
कपिल देवच्या नेतृत्त्वाखालील विश्वचषक विजयाचा प्रवास येणार सर्वांसमोर; ‘८३’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज





