दुबई। बुधवारी (२२ सप्टेंबर) सनरायझर्स हैदराबादला इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ३३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ८ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. पण असे असले तरी या सामन्यात हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने घेतलेल्या झेलाने अनेकांचे मन जिंकले.
विलियम्सनचा भन्नाट झेल
या सामन्यात हैदराबादने दिल्लीसमोर विजयासाठी १३५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांची जोडी सलामीला फलंदाजीसाठी उतरली. या दोघांनी सुरुवात चांगली केली. शॉने तिसऱ्या षटकात खलील अहमदविरुद्ध पहिल्या आणि तिसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला होता. मात्र, याच षटकाच्या ५ व्या चेंडूवर तो विलियम्सनकडे झेल देऊन बाद झाला.
खलीलने पाचवा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा टाकला. ज्यावर फटका मारताना शॉ नियंत्रणात नव्हता. त्यामुळे चेंडू हवेत उडाला. यावेळी मिड-ऑनवरुन विलियम्सन उजवीकडे पळत गेला. यावेळी त्याची नजर केवळ चेंडूवर होती. त्यामुळे त्याने चेंडूचा अंदाज घेत अप्रतिम झेल घेतला. त्यामुळे शॉ याला ११ धावांवर बाद होत माघारी परतावे लागले.
विलियम्सनचा हा झेल पाहून समालोचन करत असलेले दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी ऑन एअर म्हटले की त्याच्या झेलाने त्यांना १९८३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात कपिल देव यांनी विवियन रिचर्ड्स यांच्या घेतलेल्या झेलाची आठवण झाली.
Captain Fantastic 🔥 pic.twitter.com/w6LDkVZOnq
— Yash😊🏏 (@YashR066) September 22, 2021
https://twitter.com/CowCorner9/status/1440714324897456141
दोन मोठ्या भागीदाऱ्यांमुळे दिल्लीचा एकतर्फी विजय
शॉ बाद झाल्यानंतर मात्र, दिल्लीने हैदराबादला झटपट यश मिळू दिले नाही. शिखर धवनने श्रेयस अय्यरसह दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. त्यामुळे दिल्लीच्या विजयाचा पाया रचला गेला. शिखर ११ व्या षटकात राशिद खानविरुद्ध खेळताना अब्दुल सामदकडे झेल देऊन बाद झाला. शिखरने ३७ चेंडूत ४२ धावा केल्या. या खेळीत त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारला.
शिखर बाद झाल्यानंतर श्रेयस आणि कर्णधार रिषभ पंतने तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ६७ धावांची भागीदारी केली आणि दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. श्रेयसने ४१ चेंडूत नाबाद ४७ धावा केल्या. या खेळीत त्याने २ चौकार आणि २ षटकार मारले. तर पंतने २१ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकांरांसह नाबाद ३५ धावा केल्या. दिल्लीने १७.५ षटकात १३९ धावा केल्या.
तत्पूर्वी हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ बाद १३४ धावा केल्या होत्या. हैदराबादकडून अब्दुल सामदने सर्वाधिक २८ धावा केल्या. त्याचबरोबर राशिद खानने २२ धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. दिल्लीकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच एन्रीच नॉर्किए आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
हैदराबादचा ८ सामन्यांत सातवा पराभव, यापूर्वी ‘या’ चार संघांनीही केलाय असा लाजीरवाणा विक्रम
Video: चेन्नईच्या फिरकीपटूने नेटमध्ये टाकला ‘इतका’ वेगवान चेंडू की, रायडू अन् ऋतुराजही झाले चकीत
‘गब्बर’चा धमाका! आयपीएल २०२१मध्ये ४०० धावा करताच शिखरने ‘या’ यादीत रोहित, विराट, वॉर्नरला पछाडले