भारत विरुद्ध इंग्लंड पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. मात्र मालिका सुरु होण्यापूर्वीच युवा सलामीवीर शुभमन गिलला गुडघ्याची दुखापत झाली असून तो कमीतकमी दोन महिने क्रिकेटपासून दूर राहू शकतो. तसेच, तंदुरुस्त नसल्यास तो या मालिकेतून बाहेर पडू शकतो. अशा परिस्थितीत युवा सलामीवीर पृथ्वी शॉ भारतीय कसोटी संघात सामील होणार असल्याची चर्चा आहे.
मागील दोन दिवसांपासून येत असलेल्या बातम्यांनुसार, गिलऐवजी पृथ्वीला कसोटी संघात सामील करावे अशी व्यवस्थापनाने मागणी केली आहे. मात्र, शॉच्या संघातील समावेशाच्या बातमीवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भारताचे विश्वविजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी या मुद्द्यावर बोलताना तिखट प्रतिक्रिया दिली. शॉ सध्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौर्यावर आहे.
शॉला इंग्लंडला पाठवणे गरजेचे नाही
पृथ्वी शॉला इंग्लंडला पाठवण्याच्या चर्चेवर कपिल देव यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले की, “पृथ्वीला इंग्लंडला पाठवणे गरजेचे आहे असे मला वाटत नाही. निवड करणा-यांबद्दलही आदर असणे आवश्यक आहे. त्यांनी एक संघ निवडला आहे आणि मला खात्री आहे की त्यांच्याशी (शास्त्री आणि कोहली) सल्लामसलत केल्याशिवाय हा संघ निवडला नसेल. सध्या तुमच्याकडे केएल राहुल आणि मयंक अगरवाल असे दोन मोठे सलामीवीर आहेत. आपल्याला खरोखरच तिसरा पर्याय आवश्यक आहे का? मला ते योग्य वाटत नाही.”
कपिल देव पुढे म्हणाले, “मी या निर्णयाशी सहमत नाही. निवडसमितीने निवडलेल्या संघात आधीच सलामीवीर आहेत. म्हणून मला वाटते की त्यांना खेळवायला हवे. अन्यथा संघात आधीच असणार्या खेळाडूंचा हा अपमान असेल.” कपिल देव यांनी इंग्लंड दौऱ्यावर व श्रीलंका दौऱ्यावर जाणाऱ्या संघांना शुभेच्छा देखील दिल्या.
चांगल्या फॉर्ममध्ये आहे पृथ्वी
आयपीएल २०२० व ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अपयशी ठरल्यानंतर पृथ्वी शॉला भारतीय संघातून वगळण्यात आले होते. मात्र देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएल २०२१ मध्ये धमाकेदार कामगिरी करून त्याने श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवले. पृथ्वी शॉ इंग्लंड दौऱ्यावर गेल्यास तो तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या चेतेश्वर पुजाराची जागा घेईल असे सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मी चकित झालोय, दुखापत असूनही शुबमन इंग्लंडला गेलाच कसा? माजी यष्टीरक्षकाचा मोठा प्रश्न
‘रनमशीन’ विराटची पत्नी अनुष्काही बनणार क्रिकेटपटू, पण रुपेरी पडद्यावर; ‘या’ खेळाडूची साकारणार भूमिका
सुरुवातीला साक्षी धोनीला नव्हते आवडत क्रिकेट; माहीच्या ‘या’ ३ गोष्टींमुळे बनली क्रिकेटची चाहती