माजी कर्णधार कपिल देव यांनी कर्करोगाशी लढा देत असलेले माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांच्यासाठी एक खास मॅसेज शेअर केला आहे. कपिल देव म्हणाले की, आपल्या सर्वांना एक दिवस हे जग सोडून जायचं आहे, पण त्यासाठी लढणं महत्त्वाचं आहे. त्यांनी अंशुमन गायकवाड यांचं ‘फायटर’ असं वर्णन केलं.
कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्धच्या 41 वर्षांपूर्वीच्या सामन्याचा उल्लेख केला, ज्यामध्ये अंशुमन यांनी द्विशतक झळकावलं होतं. अंशुमन गायकवाड यांनी 1983 मध्ये जालंधरच्या मैदानावर 463 चेंडूत 17 चौकारांसह 201 धावांची खेळी केली होती, जी त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
कपिल देव म्हणाले, “अंशू, मला माहित आहे की तू कठीण काळातून जात आहेस. आपण सर्वजण आयुष्यात कठीण काळातून गेलो आहोत. मला सर्व चांगले दिवस आठवतात. पहिल्यांदा जेव्हा मी तुझ्यासोबत खेळलो, तेव्हा तू माझा कर्णधार होता. जालंधरमध्ये तू दोनशे धावा केल्या होत्या. कठीण प्रसंग येतो आणि जातो, पण मला माहित आहे की तू फायटर आहेस. जे काही देवानं तुला दिलं, ते जगण्याचा प्रयत्न कर. मी तुला शुभेच्छा देतो.”
कपिल देव पुढे बोलताना म्हणाले, “आपल्या सर्वांना एक दिवस या जगातून जायचं आहे. पण माणूस असण्याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लढणे. मला आशा आहे की आपण लवकरच भेटू. आपण सर्व मिळून आनंद साजरा करू. आपण एकत्र चांगला वेळ व्यतित केला आहे. तू फक्त स्वतःची काळजी घे. तू एक अद्भुत व्यक्ती आहेस. तुझ्याकडे सांगण्यासाठी भरपूर कथा आहेत. माझ्याकडेही खूप काही बोलण्यासारखं आहे. पण तू आधी लवकर बरा हो. आपण एकत्र कॉफी घेऊ. स्वतःची काळजी घे. संपूर्ण क्रिकेट समुदायाचं तुझ्यावर प्रेम आहे. आम्हा सर्वांना तुझा अभिमान आहे. आम्हाला निराश नको करू. स्वतःची काळजी घे.”
कपिल देव यांनी बीसीसीआयला अंशुमन गायकवाड यांना मदत करण्याची विनंती केली होती. कपिल देव यांच्या विनंतीनंतर बीसीसीआयनं अंशुमन यांना 1 कोटी रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयनं निवेदनात म्हटलं की, बोर्ड 71 वर्षीय अंशुमन गायकवाड यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवणार आहे. अंशुमन यांनी 1975 ते 1987 पर्यंत भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले. ते निवडकर्ते आणि प्रशिक्षकही राहिले आहेत.
हेही वाचा –
कपिल देव यांचे प्रयत्न फळाला! कॅन्सरशी लढा देत असलेल्या माजी क्रिकेटपटूला बीसीसीआयकडून तातडीनं मदतीची घोषणा
भारताच्या माजी क्रिकेटपटूला कर्करोगानं ग्रासलं, कपिल देव यांची बीसीसीआयकडे मदतीची याचना
आयपीएलची रंगत वाढणार, 6 वर्षांनंतर युवराज सिंगची एन्ट्री होणार? ‘या’ दिग्गजाची जागा घेणार