भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीगमधील 2020 मध्ये जेतेपद पटकावले. हे रोहितचे कर्णधार म्हणून आयपीएल कारकिर्दीतील 5 वे विजेतेपद होते. आयपीएलमधील मिळालेल्या उत्तुंग यशामुळे त्याची भारतीय टी20 क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नेमणूक करावी ही मागणी जोर धरू लागली. आता माजी दिग्गज अष्टपैलु कपिल देव यांनी या विषयावर आपले मत व्यक्त केले आहे.
…तर कोहलीला कर्णधारपदावर राहू दया
कपिल देव हिंदुस्तान टाइम्स लीडरशिप समिट या ऑनलाईन कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, “आपल्या संस्कृतीत असे होऊ शकत नाही. एखाद्या कंपनीत दोन मुख्य कार्यकारी अधिकारी असतात का?, नाही. कोहली टी20 खेळत असेल आणि चांगली कामगिरी करत असेल, तर तर त्याला कर्णधारपदावर राहू द्या. तथापि इतर खेळाडूंनाही पुढाकार घेताना मला पाहायचे आहे. पण ते कठीण आहे.”
संघाला भिन्न मतांचा कर्णधार आवडत नाही-कपिल देव
“क्रिकेटच्या तीनही प्रकारात 70 ते 80 टक्के भारतीय संघ एकसारखाच आहे. या संघाला भिन्न मतांचा कर्णधार आवडत नाही. जर तुम्ही दोन कर्णधार ठेवले, तर ‘कसोटीत तो माझा कर्णधार होईल, म्हणून मी त्याला नाराज करणार नाही’ असा विचार काही खेळाडू करू शकतात,” असेही पुढे बोलताना कपिल देव म्हणाले.
वेगवान गोलंदाजांवर नाखूष
वेगवान गोलंदाजीविषयी बोलताना कपिल देव म्हणाले की “वेगवान गोलंदाज वेगवेगळ्या प्रकारे चेंडू फेकतात. त्यामुळे मी आधुनिक काळातल्या वेगवान गोलंदाजांवर फारसा खूष नाही. पहिला चेंडू क्रॉस सीम असू शकत नाही. आयपीएलमध्ये खेळाडूंना जाणवले की वेगापेक्षा स्विंग करणे अधिक महत्त्वाचे आहे.”
चेंडू स्विंग करणे अधिक महत्वाचे
गोलंदाजीबद्दल सविस्तरपणे बोलताना कपिल देव म्हणाले की, “120 किमी ताशी वेगाने गोलंदाजी करणाऱ्या संदीप शर्माचा सामना करणे कठीण होते, कारण तो चेंडू स्विंग करत होता. गोलंदाजांना हे समजून घ्यावे लागेल की वेग नाही तर चेंडू स्विंग करणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यांनी हे शिकले पाहिजे. परंतु, ते या कलेपासून दूर जात आहेत. टी नटराजन हा आयपीएलमधील माझा हिरो आहे. हा युवा गोलंदाज निर्भीडपणे गोलंदाजी करत होता आणि बरेच यॉर्कर चेंडू फेकत होता.”
…तर गोलंदाजीतील विविधतेचा फायदा होणार नाही
पुढे बोलताना कपिल देव म्हणाले की, “जर तुम्हाला चेंडू स्विंग कसा करायचा हे माहित नसेल, तर तुमच्या गोलंदाजीतील विविधतेचा काही फायदा होणार नाही. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज उत्तम दर्जाचे आहेत. शमी, बुमराह या वेगवान गोलंदाजांकडे पाहा, एक क्रिकेटर म्हणून मला हे सांगण्यात खूप आनंद होत आहे की आज आम्ही आपल्या वेगवान गोलंदाजांवर अवलंबून आहोत. आमचे गोलंदाज कसोटी सामन्यात 20 बळी घेण्यास सक्षम आहेत. आमच्याकडे कुंबळे, हरभजनसारखे उत्कृष्ट फिरकीपटूही होते.”
महत्त्वाच्या बातम्या –
अविश्वसनीय! ताशी १४८ किमी वेगवान चेंडूवर ख्रिस लिनने मारला तब्बल १२१ मीटरचा षटकार, पाहा व्हिडिओ
दुष्काळात तेरावा महिना ! दक्षिण आफ्रिका संघाच्या पुन्हा एका खेळाडूला कोरोनाची लागण
लंका प्रीमियर लीगमागची साडेसाती संपेना; दोन खेळाडू कोरोनाबाधित