सुरत। रविवारी सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफीचा अंतिम सामना कर्नाटक विरुद्ध तमिळनाडू संघात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमांचकारी झालेल्या या सामन्यात कर्नाटकने 1 धावेने विजय मिळवून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
या सामन्यात कर्नाटकने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 180 धावा केल्या आणि तमिळनाडूला विजयासाठी 181 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना तमिळनाडूला 20 षटकात 6 बाद 179 धावाच करता आल्या.
तमिळनाडूकडून बाबा अपराजितने 40 धावांची आणि विजय शंकरने 44 धावांची खेळी करत चांगली लढत दिली. तसेच नंतर आर अश्विननेही 9 चेंडूत नाबाद 16 धावांची खेळी केली. मात्र तमिळनाडूला विजय मिळवून देण्यात त्याला अपयश आले.
या सामन्यात तमिळनाडूला विजयासाठी शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. हे षटक कर्नाटककडून कृष्णप्पा गॉथमने टाकले. त्याच्या गोलंदाजीवर या षटकातील पहिल्या 2 चेंडूवर आर अश्विनने 2 चौकार ठोकत त्याचे इरादे स्पष्ट केले होते.
मात्र तिसऱ्या चेंडूवर एकही धाव निघाली नाही. चौथ्या चेंडूवर अश्विनने 1 धाव काढली आणि शंकर फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आला. पण पाचव्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केल्यानंतर दुसरी धाव घेताना शंकर धावबाद झाला. त्यामुळे मुरुगन अश्विन हा नवीन फलंदाज शेवटचा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकवर आला.
त्यावेळी तमिळनाडूला विजयासाठी 1 चेंडूत 3 धावांची गरज होती. पण त्यांना एकच धाव घेता आली आणि कर्नाटकने 1 धावेने विजय मिळवला.
कर्नाटककडून गोलंदाजी करताना रोनित मोरेने 2 विकेट्स घेतल्या, तर गॉथम, श्रेयस गोपाळ आणि जगदिशा सुचितने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्याआधी कर्नाटककडून कर्णधार मनिष पांडेने नाबाद 60 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तसेच देवदत्त पड्डीकलने 32 धावांची आणि रोहन कदमने 35 धावांची छोटेखानी खेळी केली. त्यामुळे 20 षटकात कर्नाटकला 180 धावांचा टप्पा गाठता आला.
तमिळनाडूकडून आर अश्विन आणि मुरुगन अश्विनने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच वॉशिंग्टन सुंदरने 1 विकेट घेतली.
विशेष म्हणजे कर्नाटकने यावर्षी मनिष पांडेच्या नेतृत्वाखाली तमिळनाडूचाच पराभव करत विजय हजारे ट्रॉफीचेही विजेतेपद पटकावले होते.