इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल ) २०२१ च्या उत्तरार्धातील तिसरा सामना पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळला गेला. संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान संघाने शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या या सामन्यात दोन धावांनी विजय साकार केला. राजस्थानचा युवा वेगवान गोलंदाज कर्तिक त्यागी हा सामन्याचा नायक ठरला. कार्तिकने कमाल करत अखेरच्या षटकात चार धावांचे रक्षण करत संघाला अविस्मरणीय विजय मिळवून दिला. यासोबत तो आयपीएल इतिहासात अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा गोलंदाज बनला.
कार्तिकचे संस्मरणीय अंतिम षटक
पंजाबला या सामन्यात विजयासाठी अखेरच्या षटकामध्ये ४ धावांची गरज होती. कार्तिकने पहिला चेंडू निर्धाव टाकला. दुसऱ्या चेंडूवर पहिला आयपीएल सामना खेळणाऱ्या ऐडन मार्करमने एक धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने पूरनला बाद करत सामन्यात रंगत आणली. चौथा चेंडूही निर्धाव गेला. पाचव्या चेंडूवर दीपक हुडा बाद झाल्याने अखेरच्या चेंडूवर पंजाबला विजयासाठी ३ धावांची गरज होती. अखेरच्या चेंडूचा सामना करण्यासाठी आलेल्या फॅबियन ऍलनला एकही धाव काढण्यात यश आले नाही व राजस्थानने रोमहर्षक विजय साजरा केला.
केवळ दुसऱ्यांदा घडली अशी कामगिरी
आयपीएल इतिहासात केवळ दुसऱ्यांदा अशी घटना घडली आहे ज्यामध्ये कोणत्याही गोलंदाजाने सहापेक्षा कमी धावांचे रक्षण केले. विशेष म्हणजे हे दोन्ही गोलंदाज राजस्थान संघाचा भाग होते. २००९ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुनाफ पटेलने मुंबई इंडियन्स विरुद्ध चार धावा वाचवल्या होत्या. त्यानंतर बारा वर्षांनी अशी कशी कामगिरी कोणत्याही गोलंदाजाने केली आहे.
कार्तिकचा शानदार कमबॅक
आयपीएल २०२१ च्या पूर्वार्धात बाकावर बसावे लागल्यानंतर कार्तिकला उत्तरार्धाच्या पहिल्याच सामन्यात संधी मिळाली. त्याने आपल्या पहिल्या ३ षटकांमध्ये २८ धावा खर्चल्या होत्या. मात्र, अखेरच्या षटकात ४ धावा वाचवून संघाला विजयी केले. सामन्याचा मानकरी पुरस्कार देखील त्यालाच देण्यात आला. कार्तिकने आपले आयपीएल पदार्पण गेल्या वर्षी याच मैदानावर केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅप्टन्स इनिंगसह धोनी, विराट व रोहितला न जमलेली कामगिरी राहुलने दाखवली करून