रांची। आज (4 नोव्हेंबर) जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडीयम, रांची येथे इंडिया ‘बी’ आणि इंडिया ‘सी’ (India C vs India B) संघात देवधर ट्राॅफी ( Deodhar Trophy 2019-20 ) स्पर्धेतील अंतिम सामना पार पडला. या सामन्यात इंडिया ‘बी’ संघ 51 धावांनी विजयी झाला.
या सामन्यात इंडिया ‘बी’ संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार पार्थिव पटेलने (Parthiv Patel ) घेतलेला निर्णय किती योग्य आहे हे फलंदाजांनी सामना जिंकून सिद्ध केले.
इंडिया ‘बी’कडून 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करताना केदार जाधवने 94 चेंडूत सर्वाधिक 86 धावा केल्या. यात 4 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. मात्र केदार चांगल्या लयीत फलंदाजी करत असताना ईशान पोरलच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने (Shubman Gill) केदारचा झेल घेतला आणि त्याला शतक पूर्ण करण्यापासून रोखले.
या सामन्यात केदार जाधवने (Kedar Jadhav) पाचव्या विकेटसाठी नितीश राणाबरोबर 79 धावांची भागीदारी केली. त्याचबरोबर त्याने विजय शंकरबरोबर (Vijay Shankar) 74 धावांची भागादारी केली.
या सामन्यात इंडिया बी कडून यशस्वी जयस्वालने (Yashasvi Jaiswal) 54, विजय शंकर (Vijay Shankar) 45, कृष्णाप्पा गॉथमने (Krishnappa Gowtham) 35 धावा केल्या. कर्णधार पार्थिव पटेलने केवळ 14 धावा केल्या. त्यामुळे इंडिया बीने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 283 धावा केल्या आणि इंडिया ‘सी’ संघाला 284 धावांचे लक्ष्य दिले.
इंडिया ‘सी’कडून गोलंदाजीत ईशान पोरलने (Ishan Porel) सर्वाधिक 5 विकेट्स घेतले. तर जलाज सक्सेना (Jalaj Saxena) आणि अक्षर पटेलने (Axar Patel) प्रत्येकी 1 विकेट घेतली.
त्यानंतर 284 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंडिया ‘सी’ संघाला 50 षटकात 9 बाद 232 धावा करता आल्या. इंडिया ‘सी’कडून प्रियम गर्गने (Priyam Garg) सर्वाधिक 74 धावा केल्या.
अन्य फलंदाजांपैकी अक्षर पटेलने 38, जलाज सक्सेनाने (Jalaj Saxena) 37, मयंक अगरवालने (Mayank Agarwal ) 28, तर मयंक मार्कंडेयने (Mayank Markande) 27 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल केवळ 1 धाव करून बाद झाला. इतर फलंदाजांना विशेष कामगिरी करता आली नाही.
इंडिया ‘बी’कडून गोलंदाजी करताना शाहबाज नदीमने (Shahbaz Nadeem) सर्वाधिक 4 विकेट्स घेतले. तर मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 2 आणि रूष कलरियाने (Roosh Kalaria) 1 विकेट घेतली.