गोवा: इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) केरला ब्लास्टर्स संघाने शनिवारी चेन्नईयन एफसीवर ३-० असा सोपा विजय मिळवला. या विजयासह केरला ब्लास्टर्स एफसीने उपांत्य फेरीच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. १८ सामन्यांत ३० गुणांसह आता केरला चौथ्या क्रमांकावर आला आहे. जॉर्ज डाएझ (५२ मि. व ५५ मि.) याचे दोन गोल आणि एड्रियन लुनाच्या (९० मि.) गोलने केरला ब्लास्टर्सला हा विजय मिळवून दिला.
केरला ब्लास्टर्स व चेन्नईयन एफसी यांच्यापैकी उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची सर्वाधिक संधी ही केरलाला आहे. चेन्नईयनचे आव्हान जवळपास संपुष्टात आलेले आहे आणि त्यामुळे आयएसएलचा शेवट विजयाने करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे केरला ब्लास्टर्सना त्यांनी सुरुवातीपासून टक्कर दिली. पहिल्या ३० मिनिटांत दोन्ही संघांकडून गोल करण्याचे फार प्रयत्न झाले नाही. केरलाने दोन प्रयत्न केले, परंतु तेही ऑफ टार्गेट राहिले. ३०व्या मिनिटाला चेन्नईयकडून गोल झाला, परंतु ऑफ साईट दिल्याने तो नाकारला गेला.
पुढच्या काही मिनिटांत केरला ब्लास्टर्सकडून आक्रमण झाले आणि त्यांनी फ्री किकवर गोल करण्याची सोपी संधी गमावली. ३८व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर केरला ब्लास्टर्सने रणनिती बदलली आणि एड्रीयन लुनाने थेट आक्रमण न करता चतुराईने चेंडू अल्वारो व्हॅझक्यूजकडे सोपवला आणि त्याने चेन्नईयनच्या बचावपटू व गोलरक्षकाला चकवून तो जॉर्ज डाएझकडे सोपवला. गोलजाळीच्या दोन पावलावर असलेल्या डाएझला मात्र चेंडू गोलजाळीत पाठवता आला नाही.
मात्र, दुसऱ्या हाफमध्ये डाएझने चूक सुधारली. ५२व्या मिनिटाला केरला ब्लास्टर्सने १-० अशी आघाडी घेतली. हरमनज्योत खाब्राने त्यांच्या हाफमधून चेंडू चेन्नईयनच्या हाफमध्ये टोलावला अन् तिथे लुनाने त्यावर ताबा मिळवला. लुनाने तो चेंडू डाएझकडे पास केला आणि पुढील कामगिरी त्याने चोख बजावली. तीन मिनिटांच्या आत डाएझकडून दुसरा गोल झाला आणि केरला ब्लास्टर्सने २-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर केरला ब्लास्टर्सचा दबदबा राहिला.
पुढे ८४व्या मिनिटाला लुनाकडून गोल करण्याची संधी गमावली गेली, परंतु ९०व्या मिनिटाला त्याची भरपाई त्याने केला. फ्री किकवर एड्रियन लुनाने अप्रतिम गोल करून केरला ब्लास्टर्सची आघाडी ३-० अशी मजबूत केली. या गोलनंतर केरलाने खात्यात पूर्ण ३ गुणांची भर घालताना उपांत्य फेरीचे आव्हान कायम ठेवले.
महत्वाच्या बातम्या-
जमशेदपूरचा विजयी चौकार; नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटती मात
आयएसएल: मुंबई सिटी एफसीच्या उपांत्य फेरीच्या आशा अजूनही कायम; दुबळ्या एफसी गोवाला लोळवण्यास सज्ज
केरला ब्लास्टर्स अन् चेन्नईयन एफसीसाठी ‘करा वा मरा’ सामना; उपांत्य फेरीसाठी कडवी चुरस