गोवा| सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) शनिवारी केरला ब्लास्टर्सने एफसी गोवा संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले. मध्यरक्षक के. पी. राहुल याच्या गोलमुळे ब्लास्टर्सला पुर्वार्धातील पिछाडी भरून एक गुण कमावता आला. दुसरीकडे या निकालामुळे गोव्याचे निर्णायक विजयासह गुण वाढविण्याचे प्रयत्न कमी पडले. 65व्या मिनिटाला एक खेळाडू कमी झाल्यामुळे त्यांचे विजयाचे प्रयत्न कमी पडले, त्याचवेळी ब्लास्टर्सला याचा फायदा उठवून निर्णायक गोल करण्यापासून रोखण्यातही त्यांनी यश मिळविले.
बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना पार पडला. पूर्वार्धात गोव्याने खाते उघडले. 25व्या मिनिटाला मध्य फळीतील स्पेनचा 28 वर्षीय खेळाडू जोर्गे मेंडोझाने हा गोल केला. ब्लास्टर्सला दुसऱ्या सत्रात मध्य फळीतील त्रिचूरचा 20 वर्षीय खेळाडू राहुल याने बरोबरी साधून दिली होती. आधीच्या लढतीत बेंगळुरूविरुद्ध राहुलने भरपाई वेळेत सनसनाटी गोल करीत ब्लास्टर्सचा विजय साकार केला होता.
एफसी गोवा 13 सामन्यांत पाचवी बरोबरी साधली असून पाच विजय व तीन पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 20 गुण झाले. त्यांचे तिसरे स्थान कायम राहिल, पण आघाडीवरील मुंबईच्या तुलनेत ते नऊ, तर दुसऱ्या क्रमांकावरील एटीके मोहन बागानपेक्षा 24 गुणांनी मागे आहेत.
ब्लास्टर्सने 13 सामन्यांत पाचवी बरोबरी साधली असून तीन विजय व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे 14 गुण झाले. त्यांनी बेंगळुरु एफसीला मागे टाकून सातवे स्थान गाठले. आता चौथ्या क्रमांकावरील हैदराबादच्या तुलनेत ते तीन गुणांनी मागे आहेत, पण हैदराबादचा एक सामना बाकी आहे.
मुंबई सिटी 12 सामन्यांत नऊ विजयांसह 29 गुण मिळवून आघाडीवर आहे. एटीके मोहन बागान दुसऱ्या क्रमांकावर असून 12 सामन्यांतून सात विजयांसह 24 गुण अशी त्यांची कामगिरी आहे. चौथ्या क्रमांकावरील हैदराबाद एफसीचे 12 सामन्यांतून चार विजयांसह 17 गुण आहेत.
खाते उघडण्याची शर्यत गोव्याने जिंकली. मेंडोझाने डाव्या बाजूला अथक घोडदौड करीत फ्री किक मिळविली. त्यानेच ही फ्री किक घेतली आणि उजव्या पायाने नेटच्या उजव्या कोपऱ्याच्या दिशेने फटका मारला. चेंडू ब्लास्टर्सच्या खेळाडूंच्या भिंतीमधील मध्यरक्षक साहल अब्दुल समद याच्या डोक्याला लागून नेटच्या दिशेने गेला. त्यावेळी ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स याने झेप टाकून चेंडू अडविण्याचा प्रयत्न केला, पण तो त्याच्या आवाक्याबाहेर होता.
ब्लास्टर्सने उत्तरार्धात बरोबरी साधली. कॉर्नरवर आघाडी फळीतील फॅक्युंडो पेरीरा याने मारलेल्या क्रॉस शॉटवर राहुलने हेडिंगद्वारे फिनिशींग केले. डावीकडे सुमारे सहा यार्ड अंतरावरून राहुलने लक्ष्य साधताना गोव्याचा गोलरक्षक नवीन कुमार याला चकविले.
ब्लास्टर्सने बरोबरी साधल्यानंतर गोव्याला एक खेळाडू कमी होण्याचा धक्का बसला. बचावपटू इव्हान गोंझालेझ याला पाठोपाठ दोन यलो कार्ड देण्यात आली. 65व्या मिनिटाला गोंझालेझने उजवीकडे ब्लास्टर्सचा स्ट्रायकर गॅरी हूपर याला लाथ मारली. त्यामुळे रेफरी रणजीत बक्षी यांनी ब्लास्टर्सला फ्री किक दिली आणि गोंझालेझला यलो कार्ड दाखविले. त्यावेळी गोंझालेझने बक्षी यांच्या खांद्यावर हात ठेवून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, पण त्याची ही कृतीच त्याला भोवली.
बक्षी यांनी यलो कार्ड दुसऱ्यांदा दाखवित त्याला मैदान सोडण्याचा आदेश दिला. नियमानुसार पंचांच्या अंगाला स्पर्श करण्याची खेळाडूंना परवानगी नाही. पूर्वार्धातही एक महत्त्वाची घटना घडली. ब्लास्टर्सचा बचावपटू बकारी कोने याने हाताने चेंडू नेटमध्ये ढकलल्याचे रेफरी बक्षी यांनी हेरले.
गोव्याने सुरुवातीपासून प्रयत्न केले. चौथ्या मिनिटाला कर्णधार व मध्यरक्षक एदू बेदियाने डावीकडे जास्त ताकद लावून फटका मारला. त्यामुळे बचावपटू सेव्हीयर गामा चेंडूवर ताबा मिळवू शकला नाही.
सहाव्या मिनिटाला मेंडोझाने बचावपटू अल्बर्टो नोग्युरा याच्या साथीत चाल रचली, पण याचे फिनिशींग होऊ शकले नाही. मेंडोझाने मालेला फटका नेटच्या बाहेरील बाजूला लागला. अकराव्या मिनिटाला मेंडोझाने आणखी एक प्रयत्न केला. त्याचा फटका ब्लास्टर्सचा बचावपटू बकारी कोने याने ब्लॉक केला, पण चेंडू बाहेर गेला नाही. अशावेळी समदने मध्य क्षेत्रातून धाव घेत चेंडूवर ताबा मिळविला.
संबधित बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालला हरवित मुंबई सिटीची घोडदौड कायम
आयएसएल २०२१ : सुपर सब विल्यम्सच्या गोलमुळे एटीके मोहन बागान विजयी
आयएसएल २०२०-२१ : तळातील ओदिशाने हैदराबादला बरोबरीत रोखले