---Advertisement---

‘सचिन अन् द्रविडच्या पावलावर पाऊल ठेवत कोहली पुढे जातोय,’ विरोधी संघातून कौतुक

On: गुरूवार, ऑगस्ट 19, 2021 9:15 PM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला धूळ चारत विजय मिळवला. भारतीय संघाने ५ व्या दिवशी चांगले पुनरागमन करत, इंग्लंडला १२० धावातच गारद गेले. ज्यामुळे भारतीय संघाने हा सामना १५१ धावांनी जिंकला. त्यामुळे अनेक दिग्गजांनी भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहलीचे कौतुक केले आहे.

यातच इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने देखील विराट कोहलीचा कसोटीमधील उत्साह बघून भरभरून कौतुक केले आहे. याबाबत पीटरसन म्हणाला, “कोहली आपल्या मेहनतीच्या जोरावर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांसारख्या महान खेळाडूंच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चालला आहे. ज्या प्रकारे मी विराटला ओळखतो मला माहिती आहे, त्याने या आदर्श खेळाडूंचे अनुसरण करण्यासाठी किती मेहनत घेतली आहे. त्याच्यासाठी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि इतर कसोटी क्रिकेटचे महान खेळाडू हे आदर्श आहेत.”

“कोहली कसोटी क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन करत आहे. ज्यामुळे तो पुढे जाऊन कसोटी क्रिकेटचा एक महान दिग्गज खेळाडू होऊ शकतो. हेच कारण आहे की, कोहली कसोटी क्रिकेटला एवढे महत्व देतो. तेही अशा वेळी जेव्हा कसोटी क्रिकेटला महत्त्व मिळणे खूप गरजेचे आहे. एका महान खेळाडूची कसोटी क्रिकेटसाठी असलेली आवड पाहून छान वाटते.” असेही पीटरसन म्हणाला.

दरम्यान, कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खूप काळासाठी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर राहिला होता. तसेच भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना देखील खेळला आहे. ज्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला नमवत पहिला जागतिक कसोटी अजिंक्य पदावर आपले नाव कोरले.

पीटरसन पुढे म्हणाला, “विराटला नेहमीच वाटते की, त्याच्या संघाने कोणत्याही परिस्थितीत चांगले प्रदर्शन करावे. आधी ऑस्ट्रेलियामध्ये आणि आता इंग्लंडमध्ये संघाला जिंकताना पाहून मला अत्यंत आनंद होत असेल. त्याचा उत्साह, त्याची आवड आणि संघासाठी असलेले समर्पण हे स्पष्ट दिसून येते. अजूनही त्याच्यासाठी कसोटी क्रिकेट खूप काही आहे. यासारखे क्षण त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला अधोरेखित करतात.”

भारतीय संघाने इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात नमवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यानंतर २५ ऑगस्टला हेडिंग्लेच्या मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी दोन्ही संघ एकमेकांना भिडणार आहेत. तसेच इंग्लंडने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आपला १५ सदस्यीय संघ देखील जाहीर केला आहे.

महत्वाच्या बातम्या –
“विराटने सात वर्षांपूर्वी केलेला नंबर वन बनण्याचा संकल्प”, माजी प्रशिक्षकाने केला खुलासा
उन्मुक्तपाठोपाठ आणखी एका युवा अष्टपैलूने स्विकारली निवृत्ती, अमेरिकेचे करणार प्रतिनिधित्व
हेडिंग्ले कसोटीसाठी इंग्लंड संघातील बदलांमुळे कोहलीचा फायदा, सर्वात मोठा ‘दुश्मन’ झाला बाहेर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---