इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामाचा शेवट झाला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्स संघाने जबरदस्त कामगिरी करत विजेतेपद पटकावले आहे. या हंगामात दोन नवीन संघांनी पदार्पण केले. यामध्ये गुजरात आणि लखनऊ सुपर जायंट्स या संघांचा समावेश आहे.
इंग्लंडचा क्रिकेटपटू केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने २०२२च्या आयपीएलचा अंतिम अकरा जणांचा संघ घोषित केला आहे. त्यामध्ये त्याने पाच विदेशी खेळाडूंचा समावेश केला आहे, तर त्याने विजेत्या गुजरात संघातील केवळ तीन खेळाडू आपल्या संघात सामील केले आहेत.
पीटरसनने हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याला त्याच्या अप्रतिम अष्टपैलू खेळी आणि गुजरातचे उत्तम नेतृत्व केल्याने संघात घेत कर्णधार केले आहे. यामध्ये त्याने ऑरेंज कॅपचा मानकरी असलेला जोस बटलरला सलामीवीर म्हणून निवडले आहे. पीटरसन बटलरबाबत म्हणाला, “आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये बटलर दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच त्याने तुफानी फलंदाजी करत आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक शतक करत विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.”
त्याचबरोबर त्याने क्विंटन डी कॉक, केएल राहुल, डेविड मिलर आणि लियाम लिविंगस्टोन यांनांही अंतिम अकरामध्ये स्थान दिले आहे. राहुलने पंधराव्या आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरा क्रमांक गाठला. यामध्ये त्याने १५ सामन्यांत ६१६ धावा केल्या असून पीटरसनने त्याला फलंदाजीसाठी तिसरा, तर डी कॉकला दुसरा सलामीवीर म्हणून निवडले आहे.
पंजाब किंग्जकडून खेळणाऱ्या लिविंगस्टोनचा पीटरसनने संघात समावेश केला आहे. “त्याने १४ सामन्यांत ४३७ धावा केल्या असून ८ विकेट्सही घेतल्या आहेत. तो जलद धावा करण्यात अग्रेसर आहे,” असे पीटरसनने त्याच्याबद्दल म्हटले आहे.
“फलंदाजी करताना २७ची सरासरी आणि १२ विकेट घेणे ही एकंदर चांगली कामगिरी आहे,” असे म्हणत पीटरसनने आर अश्विनला अंतिम अकरामध्ये घेतले आहे. तसेच, शेवटच्या षटकांमध्ये झटपट धावा करण्यात पटाईत असलेला अष्टपैलू राहुल तेवतिया यालाही त्याने घेतले आहे. त्याने या आयपीएल हंगामात २१७ धावा केल्या आहेत.
पीटरसनने गोलंदाजीत या आयपीएल हंगामात वेगवान गोलंदाजी करत प्रसिद्ध झालेल्या उमरान मलिक (Umran Malik), २७ विकेट्स घेत पर्पल कॅपचा विजेता युजवेंद्र चहल आणि जोश हेजेलवूड यांनाही अंतिम अकरामध्ये घेतले आहे.
तसेच पीटरसनने फलंदाजावर दबाव आणणाऱ्या राशिद खान आणि महत्वाची झटपट खेळी करणारा दिनेश कार्तिकला संघात स्थान दिले नाही. राशिदने या हंगामात अधिक विकेट्स घेतल्या नसल्या, तरी त्याचा इकॉनॉमी रेट ६.६० इतका होता.
केविन पीटरसनचा आयपीएल २०२२ अंतिम अकरा जणांचा संघ-
जोस बटलर, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल, हार्दिक पंड्या (कर्णधार), लियाम लिविंगस्टोन, डेविड मिलर, आर अश्विन, राहुल तेवातिया, उमरान मलिक, युजवेंद्र चहल आणि जोश हेजेलवूड.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिका- भारत मालिकेसाठी दोन्ही संघ ‘या’ दिवशी होणार मैदानात दाखल; बीसीसीआयने दिली माहिती
क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठी बेईमानी करणारा हॅन्सी क्रोनिए, वाचा काय केला होता राडा?
ओहो! गुजरात आयपीएलचा चँपियन बनल्यानंतर ट्रॉफी घेऊन झोपले ‘नेहरा कुटुंबीय’, Photo चर्चेत