भारत आणि न्यूझीलंड या संघांदरम्यान प्रथमच आयोजित होत असलेल्या आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द करण्यात आला. साउथम्पटन येथे पावसाने उघडीप न घेतल्याने आयोजकांनी हा निर्णय घेतला. या ऐतिहासिक सामन्यातील चार पैकी दोन दिवस हे पूर्णपणे वाया गेले तर, उर्वरित दोन दिवसही पूर्ण षटकांचा खेळ झाला नाही. अशा परिस्थितीत आता इंग्लंडचा माजी कर्णधाराने इंग्लंड मधील क्रिकेट सामन्यांचे आयोजनाविषयी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
पावसाने केला खेळ
प्रथमच आयोजित होत असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना १८ जून ते २२ जून या कालावधीत साउथम्पटनच्या रोज बाऊल मैदानावर खेळविण्यात येत आहे. मात्र, वेधशाळेने या काळात या ठिकाणी सातत्याने पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. हा अंदाज खरा ठरला.
सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे १८ जून रोजी पाऊस कायम राहिल्याने नाणेफेक न करता खेळ रद्द करण्यात आला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी मिळून देखील केवळ १४१ षटकांचा खेळ झाला. त्यानंतर, सोमवारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने एकही चेंडूचा खेळ झाला नाही.
इंग्लंडमध्ये सामने खेळवू नका
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना हा अनेक अर्थांने ऐतिहासिक सामना मानला जात आहे. मात्र, अशाप्रकारच्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. इंग्लंडचा माजी कर्णधार व सध्या समालोचक म्हणून काम करणारा केविन पीटरसन याने इंग्लंडमध्ये सामन्यांचे आयोजन करण्याविषयी मोठे वक्तव्य केले.
पीटरसनने ट्विट करत म्हटले, ‘हे बोलताना मला त्रास होत आहे. मात्र, खरे सांगतो की, अतिशय महत्त्वाच्या स्पर्धांचे सामने इंग्लंडमध्ये आयोजित करू नयेत.’
पीटरसन हा निर्भीडपणे आपली मते व्यक्त करण्यासाठी ओळखला जातो.
https://twitter.com/KP24/status/1406960631425679362?s=19
यापूर्वी देखील घडली अशी घटना
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी वेळीदेखील अशीच काहीशी घटना घडली होती. भारत आणि इंग्लंड यांच्या दरम्यानचा हा वनडे सामना पावसामुळे जवळपास चार तासांपेक्षा जास्त उशीराने सुरू झाला. या कारणाने हा सामना २०-२० षटकांचा खेळविण्यात आला होता. तसेच २०१९ विश्वचषकावेळीही अनेकदा पावसाचा व्यत्यय आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे शमी, बुमराह, ईशांत करु शकले नाहीत प्रभावी मारा, न्यूझीलंडच्या दिग्गजाने मांडले मत
उसेन बोल्ट झाला जुळ्या मुलांचा पिता, हटके नावे ठेवल्याने आला चर्चेत
पावसामुळे किवी खेळाडू ‘हा’ इनडोअर खेळ खेळण्यात झाले दंग; फोटो व्हायरल