अबुधाबी। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामातील ४२ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात पार पडला. शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्डच्या नावावर एक मोठा विश्वविक्रम झाला आहे.
या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी पंजाबला आमंत्रित केले. पंजाबने २० षटकांत १३५ धावा केल्या. यावेळी मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्डने सर्वाधिक प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. पोलार्डने ७ व्या षटकात ख्रिस गेल (१) आणि केएल राहुल (२१) या दोघांना माघारी धाडले. याबरोबरच त्याने ३०० टी२० विकेट्स पूर्ण केल्या.
तो टी२० क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स घेणारा ११ वा खेळाडू ठरला आहे. याबरोबरच टी२० क्रिकेट प्रकारात १० हजारांहून अधिक धावा करणारा आणि ३०० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा तो एकमेव क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी कोणत्याही खेळाडूला असा कारनामा करता आलेला नव्हता.
तब्बल १७ संघांकडून पोलार्डने आत्तापर्यंत ५६५ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १ शतक आणि ५६ अर्धशतकांसह ११२०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तो टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ख्रिस गेलनंतरचा (१४२७५) दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. विशेष म्हणजे गेल आणि पोलार्ड यांच्याशिवाय कोणालाही टी२० क्रिकेटमध्ये ११ हजारांहून अधिक धावा कोणाला करता आलेल्या नाहीत. तसेच आता पोलार्डने ३०० विकेट्सही घेतल्या आहेत.
पंजाबचे मुंबईला १३६ धावांचे माफक आव्हान
पंजाबकडून एडेन मार्करमने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. मार्करमने दीपक हुडासह ६१ धावांची भागीदारी केली. हुडाने २८ धावा केल्या. तसेच केएल राहुलने २१ धावा केल्या. याव्यतिरिक्त कोणालाही २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. त्यामुळे पंजाबला २० षटकांत ६ बाद १३५ धावाच करता आल्या. मुंबईकडून जसप्रीत बुमराह आणि कायरन पोलार्डने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच कृणाल पंड्या आणि राहुल चाहरने प्रत्येकी १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
जडेजा, इरफाननंतर फक्त अष्टपैलू कृणाललाच जमलाय आयपीएलमधील ‘हा’ पराक्रम, वाचा सविस्तर
रोहितसारखा दिसणारा व्यक्ती पाकिस्तानात पितोय सरबत; फोटोने वेधले सोशल मीडियाचे लक्ष