आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मधील 21 वा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे खेळल्या गेलेल्या या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने शानदार प्रदर्शन करत 4 विकेट्स राखून विजय मिळवला. भारताच्या या विजयात पुन्हा एकदा संघाचा महान फलंदाज विराट कोहली हिरो ठरला. या सामन्यात त्याने धावांचा पाठलाग करताना फलंदाजी करत 95 धावांची जबरदस्त खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 95 धावांच्या खेळी करत विराट कोहली (Virat Kohli) याने श्रीलंकेचा माजी फलंदाज सनथ जयसूर्याच्या 13430 वनडे धावांना मागे टाकले आहे. विराट कोहली त्याच्या पुढे गेला आहे. आता विराट कोहलीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13437 धावा आहेत आणि तो वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा चौथा खेळाडू बनला आहे. या यादीतील पहिल्या स्थानाबाबत बोलायचे झाले तर, क्रिकेटचा देव म्हटला जाणारा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) पहिल्या स्थानावर आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 18426 धावा आहेत.
दुसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा महान फलंदाज कुमार संगकारा (Kumar Sangakkara) आहे. त्याच्या नावावर 14234 धावा आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याचे नाव आहे. त्याच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 13704 धावा आहेत. विराट कोहलीचा सध्याचा फॉर्म पाहता तो लवकरच एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रिकी पाँटिंगला मागे टाकेल असे दिसते.
विराट कोहलीने रविवारी (22 ऑक्टोबर) झालेल्या न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात चांगली फलंदाजी केली. या सामन्यात तो सुरुवातीपासूनच जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने 104 चेंडूंचा सामना करत 2 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने 95 धावांच्या खेळी केली. या सामन्यात विराट कोहली आपले 49 वे शतक पूर्ण करू शकला नाही आणि त्याच्या शतकाला पाच धावा कमीअसताना तो बाद झाला. (King Kohli Virat ODI record again surpassing Sri Lankan legend in This)