आयपीएलच्या या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ साखळी टप्प्यात सर्वाधिक सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानावर होता. यानंतर संघानं पहिल्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव करत अंतिम सामन्याचं तिकीट मिळवलं.
कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2024 ची फायनल 26 मे रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळली जाईल. या सामन्यापूर्वी कोलकाता संघानं सराव सत्रात भाग घेतला, जिथे कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरनं गोलंदाजीत आपला हात आजमावला. सराव सत्रादरम्यान तो संघाचा स्टार फिरकीपटू सुनील नारायणच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसला.
कोलकाता नाईट रायडर्सनं त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर गोलंदाजी करताना दिसत आहे. श्रेयसनं सुनील नारायणच्या गोलंदाजी स्टाईलची अगदी हुबेहुब नक्कल केली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. चाहते यावर सातत्यानं कमेंट करून श्रेयसचं कौतुक करत आहेत.
Skipper Shreyas. Bowling style: T20 GOAT! 😉 pic.twitter.com/QeC5iBrsFG
— KolkataKnightRiders (@KKRiders) May 25, 2024
श्रेयस अय्यरनं आंतरराष्ट्रीय स्तरावर गोलंदाजी केली आहे. त्यानं कसोटीत एक षटक टाकलं आहे. याशिवाय त्यानं मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही गोलंदाजी केली आहे, मात्र त्याला फारसं यश मिळालेलं नाही. श्रेयस अय्यरनं आयपीएलमध्ये फक्त एकदाच (2022 मध्ये) गोलंदाजी केली होती.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएलचा शेवटचा हंगाम खेळला नव्हता. तो आयपीएल 2024 मध्ये केकेआरमध्ये परतला आहे. कोलकाताला अंतिम फेरीपर्यंत नेण्यात श्रेयस अय्यरचं योगदान खूप कौतुकास्पद आहे. श्रेयसच्या नेतृत्व कौशल्याचं कौतुक शेन वॉटसनसारख्या दिग्गज खेळाडूनंही केलं आहे. वॉटसनच्या मते, श्रेयसनं त्याच्या सभोवतालच्या खेळाडूंना प्रगती करण्यास मदत केली. श्रेयस अय्यरनं या हंगामात 13 सामन्यात 38.33 च्या सरासरीनं 345 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विजेतेपद जिंकणाऱ्या संघावर होणार पैशांचा वर्षाव! ऑरेंज अन् पर्पल कॅप मिळवणारे खेळाडूही होतील मालामाल
आयपीएल फायनलपूर्वी हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सनं दिला केकेआरला इशारा!
आयपीएलच्या अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस आहे का? पावसानं खोळंबा घातला तर कोणता संघ बनेल चॅम्पियन?