शुक्रवारी (१५ एप्रिल) मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने कोलकाता नाइट रायडर्सला पराभूत केले. हैदराबादने ७ विकेट्स राखून विजय मिळवला. केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने संघातील गोलंदाजांना पराभवासाठी जबाबदार ठरवले. तसेच खूप थकल्यासारखे जाणवत असल्याचेही श्रेयसने सांगितले.
केकेआरचा चालू हंगामातील ६ सामन्यांमधील हा तिसरा पराभव आहे, तर दुसरीकडे हैदराबादसाठी पाच सामन्यांतील तिसरा विजय आहे. दोन्ही संघांकडे प्रत्येक ६-६ गुण आहेत, पण नेट रन रेटच्या जोरावर केकेआर चौथ्या आणि हैदराबाद ७ व्या क्रमांकावर आहे. या सामन्यात हैदराबादला मिळालेल्या विजयात राहुल त्रिपाठीचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. तसेच एडम मार्करमने देखील उल्लेखनीय खेळी केली.
सामना संपल्यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) म्हणाला की, “खूप थकल्यासारखे वाटत आहे. मला वाटले होते की, ही एक चांगली धावसंख्या आहे. खरं सांगायचं, तर त्रिपाठीने येऊन सामन्याची दिशा बदलून टाकली आणि आम्हाला काही विचार करण्याची संधीही दिली नाही. चेंडू ज्या पद्धतीने सीम करत होता, त्यांच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. एका फलंदाजी फळीच्या रूपात आम्ही चांगला प्रयत्न केला, पण आमचे गोलंदाजी आक्रमण काही खास करू शकले नाही.”
दरम्यान, सामन्याच्या सुरुवातीला सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना केकेआरने ८ विकेट्सच्या नुकसानावर १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादने हे लक्ष्य ३ विकेट्सच्या नुकसानावर आणि १७.५ षटकांमध्ये गाठले.
केकेआरसाठी नितिश राणा आणि आंद्रे रसलने अनुक्रमे ५४ आणि ४९ धावांची सर्वाधिक योगदान दिले. प्रत्युत्तरात हैदराबादसाठी राहुल त्रिपाठीने अवघ्या ३७ चेंडूत ७१ धावा ठोकल्या. तसेच एडम मार्करमने ३६ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी केली. त्रिपाठी सामनावीर पुरस्काराचा मानकरी देखील ठरला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022| केव्हा आणि कुठे पाहाल दिल्ली वि. बेंगलोर सामना, कसे असेल हवामान; जाणून घ्या सर्वकाही
IPL2022| मुंबई वि. लखनऊ सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!