भारतीय क्रिकेट संघाचा २१ वर्षीय क्रिकेटपटू शुबमन गिल हा सध्या जोरदार चर्चेत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून हा युवा शिलेदार प्रकाशझोतात आला आहे. त्यामुळे यंदा आयपीएल २०२१ हंगामातील त्याच्या कामगिरीवर सर्वांचेच लक्ष लागले आहे. महत्त्वाचे म्हणजे, फलंदाजीबरोबर शुबमन गोलंदाजी विभागातही पारंगत आहे. परंतु एका घटनेनंतर त्याने गोलंदाजी करणे बंद केले होते.
एका मुलाखतीत बोलताना शुबमन म्हणाला की, “मी १६ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील क्रिकेट खेळत असताना खूप गोलंदाजी करत असायचो. परंतु १९ वर्षांखालील क्रिकेट खेळताना एकदा मला संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे चेतावणी देण्यात आली होती. त्यामुळे मी गोलंदाजी करणे बंद केले होते.”
शुबमन कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सराव सत्रात बऱ्याचदा गोलंदाजी करताना दिसत असतो. अशात आयपीएलच्या चौदाव्या हंगामातही गोलंदाजी करणार का? विचारले असता शुबमन म्हणाला की, “मी गोलंदाजी करण्याची शक्यता आहे. मला वाटते की मी गोलंदाजीतही चांगली कामगिरी करु शकतो.”
शुबमन हा २०१८ पासून कोलकाता संघाचा भाग आहे. १.८ कोटी रुपयांना कोलकाताने त्याला विकत घेतले होते. तेव्हापासून आतापर्यंत शुबमनने कोलकाताकडून ४१ आयपीएल सामने खेळले आहेत. दरम्यान ३३.५४ च्या सरासरीने ९३९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ७ अर्धशतकांचाही समावेश आहे.
अशात फलंदाजीत हातखंडा असलेला शुबमन यंदा संधी मिळाल्यास गोलंदाजीतही आपली छाप सोडेल का नाही?, हे पाहणे औतुस्क्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोण असेल धोनीचा उत्तराधिकारी आणि कोण घेणार हेजलवुडची जागा? ऐका सीएसके सीईओच्या तोंडून
साता समुद्रापार असूनही आर्चरचे आयपीएलवरचे प्रेम काही कमी होईना; शेअर केला ‘हा’ खास फोटो
पाकिस्तानविरुद्धची वनडे मालिका अर्ध्यात सोडून ‘या’ संघाचे शिलेदार निघाले आयपीएल वारीला