मुंबई । 19 सप्टेंबरपासून सुरू होणार्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल 2020) साठी राजस्थान रॉयल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ गुरुवारी संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे पोहोचले. राजस्थान आणि पंजाबची टीम विशेष विमानाने दुबईला पोहोचली. गुरुवारी संध्याकाळी कोलकाता नाईट रायडर्स संघही अबू धाबी येथे पोहोचले.
युएईकडे जाण्यापूर्वी अनेकदा खेळाडूंची चाचणी घेण्यात आली होती आणि आता त्यांना सहा दिवस वेगळं रहावे लागेल. ज्यामध्ये कोविड -19ची पहिल्या, तिसर्या आणि सहाव्या दिवशी तपासणी केली जाईल. यात खेळाडू निगेटिव्ह आले, तरच ते स्पर्धेच्या ‘बायो-बबल’ मध्ये प्रवेश करू शकतील आणि प्रशिक्षण सुरू करतील. तसेच, स्पर्धेदरम्यान प्रत्येक पाचव्या दिवशी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांची चाचणी केली जाईल. या तिघांनी प्रस्थान करण्यापूर्वी त्यांच्या खेळाडूंचे आणि सहाय्यक कर्मचार्यांचे फोटो पोस्ट केले.
गतविजेता मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघ शुक्रवारी युएईला पोहोचतील तर सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल या शनिवार अथवा रविवारी पोहोचतील. आयपीएलचे सामने दुबई, अबू धाबी आणि शारजाह अशा तीन ठिकाणी 53 दिवस खेळले जातील. अंतिम सामना 10 नोव्हेंबर रोजी होईल.
यावेळी रिकाम्या स्टेडियममध्ये आयपीएल होणार आहे, परंतु अमिरात क्रिकेट बोर्डाला काही चाहत्यांना हा सामना सुरक्षितपणे पाहण्याची परवानगी द्यायची आहे. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे सरचिटणीस मुबाश्री उमसाणी यांच्या ईमेलनुसार, “अमिराती क्रिकेट बोर्ड प्रशासकांच्या संपर्कात आहे आणि चाहत्यांना स्टेडियममध्ये जाण्याची परवानगी देण्याचा प्रत्येक मार्ग शोधत आहे.”