इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) च्या तयारीने आता चांगलाच जोर धरला आहे. स्पर्धेतील पूर्वीच्या आठ संघांनी खेळाडू रिटेन केल्यानंतर आता अहमदाबाद व लखनऊ या दोन नव्या संघांनीही आपले प्रत्येकी तीन ड्राफ्ट खेळाडू जाहीर केले आहेत. यासह स्पर्धेतील १० पैकी ७ संघांचे कर्णधार ही जाहीर झाले आहेत. अशात, उर्वरित तीन संघाचे कर्णधार कोण असणार याविषयी मेगा लिलावात निर्णय होऊ शकतो.
या संघांचे कर्णधार घोषित
स्पर्धेतील दहापैकी सात संघांचे कर्णधार घोषित करण्यात आले आहेत. गतविजेत्या चेन्नईचे नेतृत्व एमएस धोनी, मुंबई इंडियन्सचे नेतृत्व रोहित शर्मा, राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व संजू सॅमसन, दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व रिषभ पंत, सनरायझर्स हैदराबादचे नेतृत्व केन विलियम्सन, अहमदाबाद संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या व लखनऊ संघाचे नेतृत्व केएल राहुल करताना दिसून येईल.
याव्यतिरिक्त कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स व रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाचे नेतृत्व कोण करणार याबाबत उत्सुकता आहे. कोलकाताने रिटेन्शनमध्ये आंद्रे रसेल, सुनील नरीन, व्यंकटेश अय्यर व वरूण चक्रवर्ती यांना कायम केले आहे. आरसीबीने माजी कर्णधार विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल व मोहम्मद सिराज यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तर, पंजाबने सलामीवीर मयंक अगरवाल व युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग यांना संघात कायम ठेवले आहे.
हे बनू शकतात उर्वरित संघांचे कर्णधार
उर्वरित तीन संघांचे कर्णधार कोण याचा शोध १२ व १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेगा लिलावात संपू शकतो. कारण, मेगा लिलावानंतर हे संघ आपला कर्णधार घोषित करू शकतात.
माध्यमांतील वृत्तानुसार, कोलकाता संघ दिल्लीचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर याच्यावर मोठी बोली लावून त्याला संघात घेण्यास इच्छुक आहे. तो संघात आल्यास त्याच्याकडेच संघाची धुरा दिली जाईल. तसेच, आरसीबी कर्णधार म्हणून पहिली पसंती कर्नाटकचाच रहिवासी असलेल्या मनीष पांडे याला देण्याची शक्यता आहे. अन्यथा, ग्लेन मॅक्सवेल कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी घेऊ शकतो. पंजाब संघाचा कर्णधार कोण होणार याबाबत कमालीची अनिश्चितता आहे. मयंक अगरवाल कर्णधारपदासाठी इच्छुक असल्याचे बोलले जातेय. मात्र, मेगा लिलावात डेव्हिड वॉर्नर हा पंजाबचा भाग झाल्यास त्याच्याकडे निश्चितपणे संघाची धुरा दिली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई-पुणे भूषवणार आयपीएल २०२२ चे यजमानपद? ‘या’ दिवशी होऊ शकतो शुभारंभ (mahasports.in)