मुंबई | ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाची काल घोषणा करण्यात आली. यात २ टी२० सामन्यांच्या मालिकांसह ५ वनडे सामन्यांचा समावेश आहे.
या मालिकेपुर्वी अजिंक्य रहाणेच्या नावाची माध्यमांसह सर्वत्र चर्चा होती. त्याची निवड राखीव सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत निवड होईलच परंतु विश्वचषकातही रहाणेला संधी मिळू शकते असेच अनेक क्रिकेट तज्ञांचे मत होते. याला कारण म्हणजे ज्या खेळाडूचा या राखीव सलामीवीर म्हणून विचार होत होता त्या केएल राहुलला सतत आलेले अपयश.
असे असताना निवड समितीने अजिंक्य रहाणेऐवजी कर्नाटकच्या केएल राहुलची संघात निवड केली. हे करताना निवड समितीने ‘पुन्हा एकदा’ असे म्हणण्यापेक्षा कायमचाच राहुलवर विश्वास टाकलेला दिसतोय.
ऑस्ट्रेलिया मालिकेपुर्वी इंग्लंड लायन्स अर्थात इंग्लंड अ भारतात इंडिया अ विरुद्ध ५ वनडे आणि २ कसोटी सामने खेळणार होता. यातील पहिल्या तीन वनडे सामन्यांसाठी इंडिया अ संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे देण्यात आले होते. शेवटच्या दोन वनडेत महाराष्ट्राचा अंकित बावणेने संघाचे नेतृत्व केले. तर दोन कसोटी सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात बावणेने तर दुसऱ्या सामन्यात केएल राहुलने इंडिया अच्या नेतृत्वाची धुरा वाहिली.
वनडे मालिकेत रहाणेला पहिल्या तीन सामन्यांत संधी देताना बाकी दोन वनडे सामन्यांत संधी दिली नाही. तसेच त्याला थेट १२ फेब्रुवारीला सुरु झालेल्या इराणी कप स्पर्धेत शेष भारताचे नेतृत्व सोपवले.
इंडिया अचा शेवटचा वनडे सामना ३१ जानेवारीला संपणार होता आणि इराणी चषक १२ फेब्रुवारीला सुरु होणार होता तर रहाणेला संपुर्ण वनडे मालिकेत खेळविण्यात निवड समितीला काहीच हरकत नव्हती.
दुसऱ्या बाजूला निवड समितीने केएल राहुलला मात्र पाचही सामन्यात निवड करताना शेवटच्या तीन वनडे सामन्यांत खेळण्याची संधी दिली. म्हणजे निवड समितीने एकप्रकारे आधीच केएल राहुलला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संधी देण्याचे ठरवलेच होते का?
बरं अस असल तरी रहाणेची कामगिरी वनडे मालिकेत इंग्लंड लायन्सविरुद्ध कुठेही खराब झाली नाही. त्याला ज्या तीन सामन्यांत संधी मिळाली त्यात त्याने ५९, ९१ आणि ० अशी कामगिरी केली. अगदी काल जेव्हा निवड समितीची बैठक मुंबईत झाली त्याआधी त्याने इराणी कप स्पर्धेत ८७ धावांची शानदार खेळी शेष भारत संघाला गरज असताना केली होती.
अगदी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याची कामगिरी समाधानकारकच होती. असे असताना निवड समितीने राखीव सलामीवीर म्हणून त्याचा प्राधान्य क्रमाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत विचार करायला हवा होता.
केएल राहुल आणि संघात निवड होणे होणे हे समीकरण आता पक्के झाले आहे. कोणत्याही खेळाडूबरोबर स्पर्धा असली तरी राहुलची निवड जवळपास पक्की असते.
इंग्लंड लायन्सविरुद्धच्या वनडे मालिकेत १३, ४२ आणि ० अशी कामगिरी केली. ही कामगिरी रहाणेच्या कामगिरीच्या आसपासही नव्हती. दुसऱ्या बाजूला त्याने कसोटी मालिकेत ८९ आणि ८१ धावांची खेळी केली. परंतु वनडे संघात निवड करताना निवड समिती कधीपासून कसोटी मालिकेतील कामगिरीचा विचार करु लागली आहे? किंवा केवळ ठराविक खेळाडूला संघात घ्यायचे असेल तरच असा विचार केला जातोय का?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील कामगिरी केएल राहुलसहित सर्वच भारतीयांनाही आठवावी वाटणार अशीच होती. तरीही निवड समितीने त्यानंतर त्याने केलेल्या अशा कोणत्या कामगिरीच्या आधारे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान दिले हे त्यांनाच माहित.
आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत रोहित आणि शिखर धवनचा समावेश असताना आणि मधल्या फळीत विराट, रायडू आणि धोनीचे स्थान पक्के असताना त्याला फलंदाजीची संधी जवळपास मिळणार नाही आणि संधी मिळाली नाही म्हणजे पुढच्या मालिकेत पुन्हा संधी हे सुत्र पक्के असणार. याच सुत्राने हा कर्नाटकचा शिलेदार विश्वचषक २०१९चा राखीव सलामीवीर म्हणून जाणार हे जवळपास आता पक्के झाले आहे.
कर्णधार, प्रशिक्षक, संघव्यस्थापन आणि निवड समितीला विश्वचषक जिंकून देणारे, क्षमता असणारे खेळाडू १५ जणांच्या संघात इंग्लंड न्यायचे आहेत की आपल्या मर्जीतील खेळाडूंना संधी द्यायची आहे हे समजायला मात्र क्रिकेटप्रेमींनी कारण सापडेना.
महत्त्वाच्या बातम्या-
–टीम इंडियाची घोषणा, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे १५ जणांचा चमू
–पंतचा समावेश योग्य का? धोनी, कार्तिक व पंतची गेल्या एक वर्षातील कामगिरी पहाच