टी२० विश्वचषक २०२१ मध्ये भारतीय संघ काहीसा अडचणीत सापडला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या पराभवामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचे धाबे दणाणले आहेत. ३१ ऑक्टोबर रोजी संघाला न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरायचे आहे आणि या करो अथवा मरो सामन्यात भारताला कोणत्याही परिस्थितीत जिंकावेच लागेल.
दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात विजय मिळाला नाही तर, टी२० विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपदही हातातून निसटून जाईल. भारतीय संघाची नौका पार करण्याची जबाबदारी केएल राहुल, रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांच्या खांद्यावर असेल. न्यूझीलंड संघाविरुद्ध राहुल आणि रोहितची कामगिरी अप्रतिम राहिली असून, आकडेवारीनुसार या दोन्ही फलंदाजांनी खेळ केला तर उपांत्य फेरीचे तिकीट निश्चित होऊ शकते.
अशी राहिली आहे न्यूझीलंडविरुद्ध कामगिरी
केएल राहुलने आतापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध ५ टी२० सामने खेळले आहेत आणि यादरम्यान त्याच्या बॅटमधून १४४.५१ च्या स्ट्राइक रेटने २२४ धावा आल्या आहेत. यात त्याची सरासरी ५६ आहे. तर या भारतीय सलामीवीराने दोन अर्धशतकेही झळकावली आहेत. न्यूझीलंड संघाविरुद्धही रोहितची कामगिरी चांगली राहिली आहे. रोहितने आतापर्यंत खेळलेल्या १३ सामन्यांमध्ये १३७.९५ च्या स्ट्राईक रेटने ३८८ धावा केल्या आहेत. गेल्या वर्षी या दोन्ही फलंदाजांनी न्यूझीलंडच्या भूमीवर जोरदार धुमाकूळ घातला होता. टी२० क्रिकेटच्या मालिकेत भारतीय संघाला ५-० असा विजय मिळवून दिला होता. त्यात रोहितने ४ सामन्यात १५० च्या स्ट्राईक रेटने १४० धावा केल्या.
विश्वचषकात भारताची खराब कामगिरी
टी२० विश्वचषकात भारतीय संघाला आजपर्यंत न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. २००७ च्या टी२० विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये पहिला सामना झाला होता ज्यात न्यूझीलंडने भारताचा १० धावांनी पराभव केला होता. न्यूझीलंड हा एकमेव संघ होता ज्याने या स्पर्धेत भारताला पराभवाची चव चाखवली होती. यानंतर, २०१६ च्या टी२० विश्वचषकात दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले होते. येथेही न्यूझीलंड संघाने भारताचा ४७ धावांनी एकतर्फी पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
हरभजन सिंग म्हणतो, न्यूझीलंडविरुद्ध भारताने ‘या’ खेळाडूला द्यावे प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान





