भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल अनेकवेळा प्राण्यांची आणि गरीब मुलांची मदत करण्यासाठी पुढे येत असतो. अशाच प्रकारे त्याने आपल्या ‘गली’ ब्रॅंडबरोबर पुन्हा एकदा गरीब मुलांची मदत करण्याचा निश्चय केला होता. यामध्ये त्याने २०१९मधील वनडे विश्वचषकातील आपल्या बॅटचा लिलाव केला. तसेच ग्लोव्हज, पॅड्स आणि हेल्मेट अशा वस्तूंचाही लिलाव केला होता.
या लिलावात राहुलच्या बॅटला सर्वाधिक २,६४,२२८ इतकी रक्कम मिळाली आहे. याव्यतिरिक्त त्याच्या हेल्मेटला १,२२, ६७७ रुपये आणि पॅड्सला ३३,०२८ रुपये मिळाले. तसेच राहुलच्या वनडेतील जर्सीला १,१३,२४० रुपये, टी२०तील जर्सीला १,०४,८४२ आणि कसोटीतील जर्सीला १,३२,७७४ रुपये मिळाले. तर, ग्लोव्हजला २८,७८२ रुपये मिळाले.
राहुलने १८ एप्रिलला आपला २८वा वाढदिवस साजरा केला होता. त्याचवेळी त्याने बॅटचा लिलाव (Bat Auction) करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु याची माहिती २० एप्रिलला समोर आली. याबद्दल बोलताना राहुल म्हणाला होता की, “हा माझ्यासाठी महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे मी आणि गलीने चांगले आणि खास काही तरी करण्याचा निर्णय घेतला आहे.”
राहुल पुढे म्हणाला होता की, “मी माझे क्रिकेट पॅड्स, ग्लोव्ह्ज, हेल्मेट आणि माझी जर्सी भारतीय सेनेच्या भागीदारीने देण्याचा निर्णय घेतला आहे. ते लोक या सर्व वस्तूंचा लिलाव करणार आहेत. तसेच यातून मिळणारा निधी अवेअर फाऊंडेशनमध्ये (Aware Foundation) जाईल. हे फाऊंडेशन मुलांची मदतीसाठी काम करते. हे माझ्यासाठी खूप खास आहे. यापेक्षा चांगला दिवस मी निवडू शकत नाही.”
राहुल यापूर्वीही अनेक वेळा लोकांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. यापूर्वी त्याने समाजसेवी संस्था ‘फूल वर्षा’च्या मदतीची घोषणा केली आहे. ही संस्था लॉकडाऊन (Lockdown) दरम्यान गरीब आणि गरजू लोकांना जेवणाची सोय उपलब्ध करून देत आहे. इतकेच नव्हे तर त्याने ‘स्टे हॅप्पी’ नावाच्या संस्थेचीही मदत केली होती. जे बेंगळुरुमधील भटक्या प्राण्यांची मदत करतात.
ट्रेंडिंग घडामोडी-
-देशात कोरोनाचा तर या क्रिकेटपटूच्या घरी चोरट्यांचा कहर
-बापरे! २०१९ क्रिकेट विश्वचषकात मिळालेलं जोफ्रा आर्चरच मेडल हरवलं, पुढे…