रणजी ट्रॉफी 2025-26 हंगामात पंजाब आणि कर्नाटक यांच्यात मोहाली येथे सुरू असलेल्या सामन्यात एक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाला. 30 जानेवारी रोजी पंजाबचा डावखुरा फिरकीपटू हरप्रीत ब्ररार याने कर्नाटकचा स्टार फलंदाज केएल राहुलला क्लीन बोल्ड करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हरप्रीतच्या त्या एका चेंडूने सामना रंगतदार झाला असून राहुलचा उडालेला मिडल स्टंप दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
कर्नाटककडून सलामीला आलेला केएल राहुल उत्कृष्ट लयीत दिसत होता. त्याने 86 चेंडूंमध्ये 59 धावांची दर्जेदार खेळी केली. या खेळीत राहुलने 9 अप्रतिम चौकार लगावले. मयंक अग्रवालसोबत (46 धावा) त्याने पहिल्या विकेटसाठी 102 धावांची शतकी भागीदारी रचत कर्नाटकला भक्कम सुरुवात करून दिली. राहुल शतकाच्या दिशेने वाटचाल करत असतानाच हरप्रीतने त्याच्या डावाला पूर्णविराम दिला.
कर्नाटकच्या डावातील 28व्या षटकात हरप्रीतने टाकलेला चेंडू खऱ्या अर्थाने ‘मॅजिक बॉल’ ठरला. लेग स्टंपवर पिच झालेला चेंडू अचानक वळला. राहुल पुढे येत शॉट खेळण्याचा प्रयत्न करत होता, मात्र लाईनचा अंदाज चुकला आणि चेंडू थेट मिडल स्टंपला लागला. राहुल क्लीन बोल्ड झाला आणि प्रेक्षकांनी एक अप्रतिम क्षण अनुभवला.
सामन्याचा विचार करता, पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 309 धावा केल्या. पंजाबकडून अभिजीत गर्ग (81) आणि एमानजोत सिंह चहल (83) यांनी अर्धशतके झळकावली, तर कर्णधार उदय सहारणने 44 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रत्युत्तरात हरप्रीतने केएल राहुलसह देवदत्त पडिक्कल (9), के. व्ही. अनीश (32) आणि रविचंद्रन स्मरण (9) यांना बाद केले.
दुसऱ्या दिवसअखेर कर्नाटकने 6 विकेट गमावून 255 धावा केल्या असून संघ अजूनही 54 धावांनी पिछाडीवर आहे. हा सामना अधिक चुरशीचा होण्याची चिन्हे दिसत आहेत.






