इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवार (१२ ऑगस्ट) पासून सुरू झाला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय सलामी फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी दमदार फलंदाजी केली. त्याचबरोबर विराट कोहली आणि रिषभ पंत यांच्या छोटेखानी खेळ्यांनी भारतीय संघाने पहिल्या डावात ३६४ धावा केल्या. यात राहुलने सर्वाधिक १२९ धावा केल्या. तर रोहित शर्माने ८३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
असे असले तरी, भारतीय कसोटी संघातील दोन विश्वासू फलंदाज असलेले चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहेत. सध्या चालू असलेल्या इंग्लंड दौऱ्यातही दोघांनी म्हणावी तशी कामगिरी केली नाही. या दौऱ्यात पुजाराने ३ डावांमध्ये केवळ २५ तर, रहाणेने २ डावात केवळ ६ धावा केल्या आहेत. याचाच परिणाम म्हणून त्यांना आता चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे.
भारतीय सलामीवीराचा पाठिंबा
सगळीकडून या दोन खेळाडूंवर टीका केली जात आहे. त्यांना भारतीय संघातून काढून टाकण्याची मागणी देखील केली जातेय. अशातच भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी या दोन खेळाडूंची पाठराखण देखील केली आहे. त्यातच आता दुसऱ्या कसोटी सामन्यात शतक झळकावणाऱ्या केएल राहुलचा देखील समावेश झाला.
दुसऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस संपल्यानंतर आभासी पत्रकार परिषदेत याबाबत बोलताना राहुल म्हणाला, “या दोन खेळाडूंकडे भरपूर अनुभव आहे. ते दोघेही जागतिक पातळीवरचे खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांना चांगलेच माहीत आहे की धावा करण्यासाठी काय करावे लागते. पुजारा आणि रहाणे यांनी अनेक वेळा भारतासाठी संकट काळी मैदानात उभे राहून चांगली खेळी केली आहे. त्या दोघांकडे अनुभवाची कसलीच कमी नाही. त्यांना चांगलेच माहिती आहे की, खराब फॉर्ममधून कसे सावरायचे. इंग्लंडसारख्या वातावरणात फलंदाजी करणे नेहमीच कठीण राहिले आहे.”
तिसऱ्या दिवशी सामना बरोबरीत
भारतीय संघाने आपल्या पहिल्या डावात ३६४ धावा केल्यानंतर इंग्लंडने जोरदार प्रत्युत्तर दिले. कर्णधार जो रूटने नाबाद १८० धावांची खेळी करून संघाला २७ धावांची आघाडी मिळवून दिली. भारतातर्फे युवा मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार बळी मिळवले. चौथ्या दिवशी फलंदाजीला उतरल्यानंतर भारतीय खेळाडूंपुढे मोठी धावसंख्या रचून इंग्लंडला अशक्यप्राय आव्हान देण्याची लक्ष असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
राहुल द्रविडने मानद डॉक्टरेट घेण्यास दिला होता नकार, कारण ऐकून कराल कौतुक
उमेश यादव ‘या’ कारणामुळे कसोटी संघातून होऊ शकतो ‘आउट’