भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल (kl rahul) याने त्याच्या फलंदाजीने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. पण आता त्याने मैदानाबाहेरही असे काम केले आहे. ज्यामुळे चाहते त्याचे कौतुक करत आहेत. राहुलने एका दुर्लभ आजाराशी झगडत असलेल्या लहान मुलाच्या उपचारासाठी तब्बल ३१ लाख रुपयांची मदत केली आहे. उपचारानंतर आता हा मुलगा ठीक आहे.
या मुलाचे नाव वरद नलावडे आहे. तो एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आला होता. सध्या त्याचे वय ११ वर्ष आहे आणि पाचवीत शिकत आहे. त्याला अप्लास्टिक एनीमिया नावाच दुर्लभ आजार असून, मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याच्या आजारावरील एकमेव उपाय म्हणजे बोन मॅरो ट्रांसप्लांट, ज्यासाठी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने मदत केली आहे. उपचाराच्या खर्च करणे शक्य नसल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी एका एनजीओमधून पैसे गोळा करण्यास सुरुवात केली होती. जेव्हा केएल राहुलला याविषयी माहिती मिळाली तेव्हा त्याने उपचारासाठी लागणाऱ्या ३१ लाख रुपयांची मदत केली आहे.
केएल राहुलने या देणगीविषयी बोलताना सांगितले की, “जेव्हा मला वरदविषयी माहिती मिळाली. तेव्हा माझ्या टीमने गिव इंडियाशी संपर्क साधला. ज्यामुळे आम्हाला त्याची प्रत्येक पद्धतीने मदत करता येईल. मला आनंद आहे की, शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आशा आहे की, वरद लवकरच पायांवर उभा राहिल आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करेल. माझे योगदान जास्तीत जास्त लोकांना पुढे येण्यासाठी आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी प्रेरित करेल.”
केएल राहुलने केलेल्या मदतीनंतर वरदच्या आईने त्याचे आभार मानले आहे. त्या म्हणाल्या की, “केएल राहुलच्या मदतीशिवाय एवढ्या कमी वेळात मुलाचे बोन मॅरो ट्रांसप्लांट अशक्य होते.” वरदच्या आईने यावेळी असेही सांगितेल की, त्यांनी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की, त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी एखादा क्रिकेटर पुढे येईल.
महत्वाच्या बातम्या –
नव्या वादाला फुटले तोंड! क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ निर्णयाने आयपीएल फ्रॅंचाईजी नाराज
VIDEO: श्रीलंकेचे आव्हान पेलण्यासाठी ‘टीम इंडिया’ नवाबांचे शहर लखनऊमध्ये दाखल