आयपीएल 2025 साठी होणाऱ्या मेगा ऑक्शनपूर्वी सर्व फ्रॅन्चाईजी कोणकोणत्या खेळाडूंना रिटेन करता येईल, यावर विचार करत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, लखनऊ सुपर जायंट्सची टीम कर्णधार केएल राहुलला ऑक्शनपूर्वी रिलिज करेल. मात्र आता संघाचे मालक संजीव गोयंका राहुलची साथ सोडणार नाहीत, असं दिसत आहे. संजीव गोयंका यांनी नुकतीच एक मोठी प्रतिक्रिया दिली, ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की केएल राहुल आयपीएल 2025 मध्ये लखनऊ संघाकडूनच खेळेल.
वास्तविक, लखनऊ सुपर जायंट्सनं भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खान याची संघाच्या मेंटॉरपदी नियुक्ती केली आहे. आयपीएल 2023 नंतर गौतम गंभीरनं लखनऊची साथ सोडली. तेव्हापासून संघाला एखाद्या अनुभवी मेंटॉरची आवश्यकता होती. लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी आज (28 ऑगस्ट) झहीर खानला संघाची जर्सी देऊन त्याचं स्वागत केलं.
यावेळी आयोजित कार्यक्रमात पत्रकारांनी गोयंका यांना केएल राहुलबाबत प्रश्न विचारला. फ्रॅन्चाईजी आयपीएल 2025 पूर्वी केएल राहुलला रिलिज करणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर उत्तर देताना गोयंका म्हणाले, “माझी यावर काहीही कमेंट करण्याची इच्छा नाही. मी फक्त इतकेच म्हणेन की, केएल राहुल लखनऊ परिवाराचा सदस्य आहे.”
संजीव गोयंका यांच्या या व्यक्तव्यावरून हे स्पष्ट झालंय की, केएल राहुल आयपीएल 2025 मध्ये लखनऊ संघाकडून खेळताना दिसेल. मात्र तो संघाचा कर्णधार असेल की नाही, याबाबत काहीही सांगता येणं शक्य नाही. आयपीएल 2024 मध्ये राहुलच्या नेतृत्वात लखनऊची टीम प्लेऑफसाठी पात्र ठरण्यात अपयशी ठरली होती, हे विशेष.
हेही वाचा –
IPL 2025: संघ किती खेळाडूंना रिटेन करु शकणार? कधी येणार निर्णय? जाणून घ्या एका क्लिकवर
जय शाह यांचं एका महिन्याचं वेतन किती? बीसीसीआयमध्ये किती कमाई होत होती?
“40 टक्के सामने खेळले नाहीत आणि आराम…” रोहित-विराटबद्दल माजी खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य