स्टार यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल भारतीय संघातून हळूहळू गायब होत चालला आहे. राहुलला आधीच टी20 संघातून वगळण्यात आलं. आता त्याला कसोटी संघातूनही बाहेर करण्याची योजना असल्याचं दिसत आहे. प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा यांनी केएल राहुलला कसोटी संघातून का वगळलं जाऊ शकतं? याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
येत्या 5 सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळली जाणार आहे. यंदा या स्पर्धेत असे अनेक भारतीय खेळाडू खेळताना दिसतील, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही चांगलं नाव कमावलं आहे. दुलीप ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत केएल राहुलचंही नाव शामिल आहे. बीसीसीआयनं स्पर्धेसाठी चार संघांची घोषणा केली. यापैकी केएल राहुलचा ‘अ’ संघात समावेश आहे. राहुलसोबत या संघात यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल देखील आहे, ज्यावर आकाश चोप्रा यांनी चिंता व्यक्त करत एक धक्कादायक गणित स्पष्ट केलं.
आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाले, “केएल राहुल दुलीप ट्रॉफीसाठी ध्रुव जुरेलच्या संघात आहे. मला वाटतं की जुरेल विकेटकीपर म्हणून खेळेल. याचाच अर्थ असा की, केएल राहुल कसोटी क्रिकेटमध्ये विकेटकीपर नसेल.”
भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की, निवड समिती सध्या राहुलचा टी20 संघाच्या सेटअपमध्ये विचार करत नाही. राहुलची 2024 टी20 विश्वचषकासाठीही निवड झाली नव्हती. याशिवाय श्रीलंका दौऱ्यावर झालेल्या टी20 मालिकेतूनही त्याचं नाव गायब होतं.
केएल राहुलनं नोव्हेंबर 2022 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा टी20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. हा 2022 टी20 विश्वचषक स्पर्धेचा उपांत्य सामना होता. आता राहुल भारताच्या टी20 संघात पुनरागमन करण्यात यशस्वी होतो, की संघातून कायमचा बाहेर पडतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
हेही वाचा –
दुलीप ट्रॉफीसाठी निवड झाली नाही, 400 हून अधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज आता विदेशात क्रिकेट खेळणार
स्टीव्ह स्मिथनं आव्हान स्वीकारलं! बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताला हरवून इतिहास रचणार; म्हणाला, “यंदा…”
चेंडू मानेला लागताच थेट हॉस्पिटलमध्ये दाखल, अफगाणिस्तानच्या स्टार खेळाडूसोबत भीषण अपघात