इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत रविवारी (१८ एप्रिल) डबल हेडर सामने खेळवले गेले होते. यातील दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाला ६ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. सामना झाल्यानंतर पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुलने अंपायरबाबत भाष्य केले आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब किंग्ज संघाने १९५ धावांचा डोंगर उभारला होता. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्स संघाने ६ गडी आणि १० चेंडू राखून पूर्ण केले होते.
सामन्यानंतर मुलाखतीत, बर्थडे बॉय आणि पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार केएल राहुलने म्हटले की, “जेव्हाही आम्ही वानखेडे स्टेडियममध्ये खेळतो, तेव्हा दुसऱ्या डावात गोलंदाजी करणे थोडे कठीण जाते. आम्ही याच स्थितीसाठी तयारी करत असतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “अशा चांगल्या फलंदाजांनी भरलेल्या संघाविरुद्ध गोलंदाजी करताना कार्य आणखी कठीण होऊन जाते. आमचा संघ पराभूत झाला आहे म्हणून असे म्हणत नाही. पण बऱ्याचदा गोलंदाज ओल्या चेंडूने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. परंतु असे नेहमीच करणे कठीण असते. मी तर अंपायरला सामन्यादरम्यान म्हटले होते की, चेंडू बदलून द्या. परंतु हे नियमांमध्ये बसत नसल्याने त्यांनी माझे एक ऐकले नाही.”
पराभवाबाबत बोलताना राहुल म्हणाला, ” वाढदिवसाच्या दिवशी जर विजय मिळवला असता तर बरे वाटले असते. यामुळेच मी थोडा दु:खी आहे. परंतु आमच्याकडे खूप सामने आहेत जे जिंकून आम्ही पुनरागमन करू शकतो. आता असे वाटत आहे की, आम्ही १०-१५ धावा कमी केल्या. तसेच १९० धावा ही खूप होत्या. मी आणि मयंकने विचार केला होता की, १८०-१९० या खेळपट्टीवर खूप चांगला स्कोर असेल. शिखर धवनने खूप चांगली फलंदाजी केली त्याचे अभिनंदन.”
महत्त्वाच्या बातम्या-
मॅक्सवेलचं अर्धशतक अन् विराटकडून टाळ्यांच्या गजरात अभिनंदन, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ
शेतकऱ्याचा मुलगा, ज्याने पदार्पणात केला अर्धशतकवीर अगरवालचा अडथळा दूर; वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी
दिग्गज गोलंदाज मुरलीधरन हॉस्पिटलमध्ये दाखल; चेन्नईत तातडीने करण्यात आली अँजिओप्लास्टी