भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) या दोन्ही संघांमध्ये येत्या २६ डिसेंबर पासून ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघाला ३ कसोटी आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे. कारण, भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत एकही कसोटी मालिका आपल्या नावावर करता आली नाहीये. दरम्यान ही मालिका सुरू होण्यापूर्वी भारतीय सलामीवीर फलंदाज केएल राहुलने (Kl Rahul) पाचव्या क्रमांकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात पाचव्या क्रमांकावर कोण खेळणार? हा एक मोठा प्रश्न आहे. याबाबत बोलताना केएल राहुल म्हणाला की, “हा एक खूप कठीण निर्णय आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) हा आमच्या संघातील एक महत्वपूर्ण भाग आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत अनेक महत्वाच्या खेळ्या केल्या आहेत. तर भूतकाळात पाहायला गेलं तर, त्याने मेलबर्नमध्ये जी खेळी केली होती. ती अतिशय महत्वाची होती. ज्यामुळे आम्हाला कसोटी सामना जिंकण्यात मदत झाली होती. लॉर्डसमध्ये पुजारासोबत भागीदारी करताना त्याने अर्धशतक झळकावले होते. खरचं ही खेळी महत्वाची होती. हेच कारण होते की, आम्ही कसोटी सामना जिंकलो होतो. मध्यक्रमात तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.”
तसेच श्रेयस अय्यर(Shreyas iyer) बाबत बोलताना केएल राहुल म्हणाला की, “निश्चितच त्याने संधीचा लाभ घेतला आहे. कानपूरमध्ये त्याने शतक झळकावले होते. तो खूप उत्साही आहे. हनुमा विहारीने (Hanuma Vihari) देखील चांगली कामगिरी केली आहे. हा एक कठीण निर्णय आहे. परंतु लवकरच आम्ही याबाबत चर्चा करू.”
श्रेयस अय्यरने कानपूर कसोटीत शतक झळकावले होते. त्यामुळे संघ व्यवस्थापक त्याला संघात स्थान देण्याचा विचार करू शकतात. तर दुसरीकडे हनुमा विहारीने देखील भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्ध धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याला खेळपट्टीचा चांगला अंदाज आहे. आता संघ व्यवस्थापन कोणाला संघात स्थान देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
हरभजनच्या निवृत्तीनंतर पत्नीची भावनिक पोस्ट; म्हणाली, ‘त्याला अशी निवृत्ती नको होती, पण..’
हे नक्की पाहा: https://youtu.be/ZvZUa3MTf1Y