येत्या काही दिवसात इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेसाठी मेगा लिलाव सोहळा पार पडणार आहे. या लिलावापूर्वी सर्व जुन्या संघांना खेळाडूंना रिटेन करण्याचे आदेश देण्यात आले होते. ज्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर होती. या रिटेन प्रक्रियेत अनेक आश्चर्यकारक निर्णय घेण्यात आले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पंजाब किंग्स संघाने आगामी हंगामासाठी केएल राहुलला रिलीज केले आहे.या आश्चर्यकारक निर्णयानंतर अनिल कुंबळे यांनी यामागील कारण सांगितले आहे.
पंजाब किंग्स संघाने आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी केवळ २ खेळाडूंना रिटेन केले आहे. या दोन खेळाडूंपैकी एक खेळाडू अनकॅप्ड आहे. तसेच त्यांनी एकही परदेशी खेळाडूला रिटेन केला नाहीये. इतकेच नव्हे तर संघाचा कर्णधार केएल राहुलला देखील रिलीज करण्यात आले आहे.
पंजाब किंग्ज संघाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी मयंक अगरवालला १२ कोटी रुपये खर्च करत रिटेन केले आहे. तर युवा गोलंदाज अर्शदीप सिंगला ४ कोटी रुपये देत पुढील हंगामासाठी रिटेन केले. अर्शदीप सिंग अनकॅप्ड खेळाडू आहे. त्यामुळे त्याला कमी मानधन मिळाले आहे. तसेच पंजाब किंग्ज संघाने रिटेन प्रक्रियेत केवळ १६ कोटी रुपये खर्च केले आहेत.
तर या कारणामुळे राहुलला केले रिलीज
पंजाब किंग्स संघाचे संचालक अनिल कुंबळे यांनी म्हटले की, “खरं तर आम्हाला केएल राहुलला रिटेन करायचं होत. हेच कारण आहे की,आम्ही त्याच्याकडे २ वर्षांपूर्वीच संघाचे कर्णधारपद सोपवले होते. परंतु त्याने स्वतः लिलावात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही त्याने घेतलेल्या निर्णयाचा आदर करतो. खेळाडूला निर्णय घ्यायचा असतो आणि आम्ही त्याच्या सोबत आहोत.” माध्यमातील वृत्तानुसार, केएल राहुल लखनौ फ्रेंचायझीच्या संपर्कात आहे. तसेच या संघात निवड होऊन त्याला कर्णधारपद देखील दिले जाऊ शकते.