भारतीय कसोटी संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारतीय संघाने सुरुवातीला कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आहे. आता भारतीय संघाला यजमानांविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही मालिका ४ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. पण त्यापूर्वी भारताला काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघाविरुद्ध तीन दिवसीय सराव सामना खेळायचा आहे. हा सराव सामना मंगळवारपासून (२० जुलै) सुरु होणार आहे.
या सामन्यादरम्यान भारतीय संघातील मयंक अगरवाल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा अशा खेळाडूंकडे लक्ष असेल. याखेळाडूंच्या कामगिरीत मागील काही सामन्यांमध्ये सातत्य नसल्याचे दिसून आले आहे. तसेच आर अश्विनने काउंटी सामन्यात प्रभावित केल्यानंतर त्याच्याकडेही या सराव सामन्यात सर्वांचे लक्ष असेल. याशिवाय वेगवान गोलंदाज कशी कामगिरी करतात, हे देखील पाहावे लागणार आहे. कारण गेल्या काही महिन्यात जसप्रीत बुमराहही फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही.
या सराव सामन्यात विराट कोहली कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळेल. तसेच रोहित शर्मा सलामीला खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
केएल राहुल करणार यष्टीरक्षण
काही दिवसांपूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने पुष्टी केली होती की युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट दयानंद गरानी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच गरानी यांच्या संपर्कात असल्याने भारताचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, यष्टीरक्षक वृद्धिमान साहा आणि अभिमन्यू ईश्वरन यांनाही क्वारंटाईन व्हावे लागले आहे. त्यामुळे भारतीय संघातील पंत आणि साहा हे दोन्ही प्रमुख यष्टीरक्षक या सराव सामन्यासाठी उपलब्ध नाहीत.
दरम्यान, असे समोर आले आहे की पंत याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून त्याचा क्वारंटाईन कालावधीही संपला आहे. मात्र, भारतीय संघाशी जोडण्यासाठी त्याला काही दिवस लागतील. त्यामुळे तो सराव सामना खेळण्याची आशा मावळली आहे. तर, साहाचा क्वारंटाईन कालावधी २४ जुलै रोजी संपणार आहे. त्याचाही कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.
अशा परिस्थितीत मंगळवारपासून सुरु होणाऱ्या सराव सामन्यात केएल राहुल यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
कधी आणि कसा पाहाता येणार सराव सामना, घ्या जाणून
हा सराव सामना २० ते २२ जुलै दरम्यान डरहॅमच्या एमिरेट्स रिव्हरसाईड मैदानात होईल. या सामन्याला स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ११ वाजता, तर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ४.३० वाजता सुरुवात होणार आहे. तसेच प्रत्येक दिवशी प्रत्येकी ९० षटकांचा खेळ होणार आहे. या सराव सामन्यासाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच या सामन्याचे थेट प्रक्षेपण डरहॅम क्रिकेटच्या युट्यूब चॅनेलवर होणार आहे.
भारताविरुद्धच्या सराव सामन्यासाठी काउंटी सिलेक्ट इलेव्हन संघ
विल रोड्स (वार्विकशायर – कर्णधार), रेहान अहमद (लीसेस्टरशायर), टॉम अस्पिनवेल (लँकाशायर), इथन बाम्बर (मिडलसेक्स), जेम्स ब्रेसी (ग्लुस्टरशायर), जॅक कार्सन (ससेक्स), झॅक चॅपल (नॉटिंघमशायर), हसीब हमीद (नॉटिंघमशायर) लिंडन जेम्स (नॉटिंघमशायर), जेक लिबी (वॉर्स्टरशायर), क्रेग माईल्स (वार्विकशायर), लियाम पॅटरसन-व्हाइट (नॉटिंघमशायर), जेम्स रे (सॉमरसेट), रॉब येट्स (वार्विकशायर).
असा आहे इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागासवाला
असे आहे इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेचे वेळापत्रक
४-८ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना, नॉटिंगघम
१२-१६ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्स
२५-२९ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना, हेडिंग्ले
२-६ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना, लंडन
१०-१४ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना, मँटेस्टर
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका वि. भारत दुसरा वनडे सामना कोठे आणि कधी होणार? जाणून घ्या सर्वकाही
पहिल्या वनडेतील विजयासह सुपर लीग गुणतालिकेत भारताची भरारी, ‘या’ स्थानी घेतली झेप
भारतीय संघासाठी खुशखबर! संपला रिषभ पंतचा क्वारंटाईन कालावधी, ‘या’ तारखेला जोडला जाणार संघासोबत