क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला वाटत असते की आपण आपल्या देशाचे कसोटीमध्ये प्रतिनिधित्व करावे. प्रत्येकाचेच हे स्वप्न पूर्ण होतेच, असे नाही. मात्र भारताचा 28 वर्षीय वेगवान गोलंदाज नवदीप सैनीचे हे स्वप्न गुरुवारी पूर्ण झाले. गुरुवारी(7 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झाला. या सामन्यातून सैनीने कसोटीत पदार्पण केले. एवढेच नाही तर त्याने ऑस्ट्रेलियाच्या विल पुकोस्कीला बाद करत पहिली विकेटही मिळवली.
सैनी आज भारतात अनेकांना माहित आहे, तो आयपीएल आणि भारताकडून मर्यादीत षटकांमध्ये त्याने केलेल्या कामगिरीमुळे. पण आता त्याचे कसोटी संघातही आगमन झाले आहे. सैनीच्या या यशात भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरचाही वाटा मोठा आहे. गंभीरने काहीवर्षांपूर्वी सैनीमधील गुणवत्ता हेरली होती.
गंभीरने ओळखली प्रतिभा
कर्नाळ, हरियाणा येथील असणाऱ्या सैनीने आयपीएलमध्येच नाही तर मागील 7 वर्षात दिल्लीकडून खेळताना देशांतर्गत क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी केली आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका वृत्तानुसार 2013 पर्यंत सैनीने लेदर बॉलचे क्रिकेट खेळले देखील नव्हते. तो कर्नाळमध्ये टेनिस बॉल स्पर्धा खेळून प्रत्येक सामन्याचे 200 रुपये मिळवायचा.
पण दिल्लीचे माजी गोलंदाज सुमित नरवाल यांनी अयोजित केलेल्या कर्नाळ प्रीमीयर लीग या टेनिस बॉल स्पर्धेत नरवाल यांनीच सैनीमधील प्रतिभा हेरली. त्यानंतर सैनीने दिल्लीच्या नेटमध्ये गोलंदाजी केली. त्यावेळी त्याच्या वेगाने भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर प्रभावित झाला.
गंभीरने सैनीला बूट घेऊन दिले तसेच त्याला नियमितपणे दिल्लीच्या नेटमध्ये गोलंदाजीसाठी बोलावले. सैनीला गंभीरचा पाठिंबा मिळाला होता. गंभीर सैनीला रणजी ट्रॉफीसाठी दिल्ली संघात घेण्यासाठी निवड समीतीशी देखील भांडला. अखेर गंभीरच्या प्रयत्नांना यश आले आणि सैनीची 2013-14 मोसमासाठी दिल्ली संघात निवड झाली.
सैनीने 2013 ला विदर्भविरुद्ध दिल्लीकडून पहिला प्रथम श्रेणी सामना खेळला. या सामन्यात त्याने चमकदार म्हणावी अशी कामगिरी केली नाही पण त्याने 2 विकेट काढल्या होत्या. पण त्यानंतर त्याने मागे वळून न पाहता 2017-18 च्या मोसमात दिल्लीकडून 8 सामन्यात खेळताना सर्वाधिक 34 विकेट्स घेतल्या.
भारत अ संघात मिळवले स्थान –
त्याने नंतर भारताच्या अ संघातही स्थान मिळवले आणि भारत अ संघाकडूनही चांगली कामगिरी केली. त्याने साल 2019 ला अफगाणिस्तान विरुद्धच्या भारताच्या एकमेव कसोटीसाठी भारतीय संघात स्थान मिळवले होते. पण त्याला अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली नाही.
तसेच सैनीने 2019 विश्वचषकासाठी इंग्लंडला जाऊन भारताच्या फलंदाजांना नेटमध्येही गोलंदाजी केली. तो या विश्वचषकासाठी भारताच्या राखीव गोलंदाजांमध्येही होता.
आयपीएलमुळे आला प्रकाशझोतात –
सन 2017-18 च्या मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकल्यामुळे सैनीला आयपीएलमध्येही जागा मिळवण्याची संधी मिळाली. त्याला 2019 च्या आयपीएलसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आपल्या संघात घेतले. त्या हंगामात त्याने प्रभावी कामगिरी केली. त्याने 13 सामन्यात 11 विकेट्स घेतल्या. त्यानंतरही बेंगलोरने त्याला संघात कायम केले. त्याने 2020 च्या हंगामात 6 विकेट्स घेतल्या.
आयपीएल 2019 मध्ये चांगली कामगिरी केल्याने त्याला भारताकडून वनडे आणि टी20 मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने 3 ऑगस्ट 2019 ला वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20मध्ये तर 22 डिसेंबर 2019 ला वेस्ट इंडिज विरुद्धच वनडे पदार्पण केले होते आणि आता त्याला कसोटी पदार्पणही करण्याची संधी मिळाली.
नवदीप सैनीची कामगिरी –
सैनीने त्याच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत 7 वनडे आणि 10 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्याने वनडेमध्ये 6 आणि आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 13 विकेट्स घेतल्या आहेत.
याशिवाय सैनीने 46 प्रथम श्रेणी सामने खेळले असून यामध्ये त्याने 28.46 च्या सरासरीने 128 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच 54 अ दर्जाच्या सामन्यांमध्ये 81 विकेट्स घेतल्या आहेत. तर आत्तापर्यंत खेळलेल्या एकूण 58 ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यांमध्ये 49 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
… म्हणून ट्रॅविस हेडला संघात स्थान नाही, कर्णधार टीम पेनची स्पष्टोक्ती
“विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अतिशय अवघड”
काय सांगता! रोहितने आत्तापर्यंत विराट शिवाय खेळला नव्हता एकही कसोटी सामना