भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या यशाच्या शिखरावर आहे. मैदानावरील खेळाबरोबरच विराट बऱ्याचश्या कंपन्यांबरोबर नवनवीन करार करत आहे. धरमशाला कसोटीमध्ये भारताला विजय मिळाल्यानंतर आयसीसीचा नंबर १ संघाचा कर्णधार म्हणून १ लाख अमेरिकन डॉलरचा चेकही विराटला मिळाला. तर काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जींकडून विराटला पद्मश्री पुरस्कार मिळाला. सध्या चर्चा आहे ती विराटच्या एका दिवसाच्या मानधनाची.
दिवसाला ५ करोड:
हे खरं आहे कि भारतीय कर्णधार हा टीव्हीवरील जाहिरातीमध्ये कायम झळकत असतो. जबदस्त कामगिरी करत असल्यामुळे विराटची ब्रँड किंमतही मोठी आहे. सध्या विराट दिवसाला ५ कोटी याप्रमाणे एका जाहिरातीचे पैसे घेतो. भारतात कोणत्याही सेलिब्रिटीला दिलेल्या फीपेक्षा ही खूप मोठी रक्कम आहे. याचबरोबर जगातील सर्वात महागड्या सेलिब्रिटीमध्ये विराटचाही समावेश झाला आहे.
दुप्पट झाली फी:
गेल्यावर्षीपर्यंत विराटची फी आजच्या फीच्या अर्धी होती. एक दिवसाला अंदाजे विराट गेल्या वर्षी अंदाजे २.५ ते ३ कोटी रुपये घेत असे. असं सांगितलं जातंय कि विराट येत्या एप्रिल महिन्यापासून ही फी घेणं सुरु करणार आहे. ह्या फी बरोबर विराट पाहिलं शूट पेप्सीको कंपनी बरोबर करेल.
कंपनीने ह्या बातम्या नाकारल्या:
विराटचं जाहिराती आणि अन्य मॅनेजमेंट पाहणाऱ्या कॉर्नरस्टोन स्पोर्टने ह्या सर्व बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे. पेप्सीको कंपनी बरोबर चर्चा सुरु असल्याच्या बातमीला मात्र त्यांनी दुजोरा दिला.
प्यूमा बरोबर केला होता सर्वात मोठा करार:
गेल्याच महिन्यात स्पोर्ट्स कंपनी प्यूमा बरोबर कोहलीने ८ वर्षांसाठी तब्बल ११० कोटी रुपयांचा करार केला आहे तर सध्या तो ऑडी लग्जरी कार, एमआरएफ टायर, टिसॉट वॉच, जिओनी फोन, बूस्ट मिल्क ड्रिंक, कोलगेट टूथपेस्ट यांच्याबरोबरही काम करत आहे.