भारतीय संघाचा कर्णधार म्हणून स्वतःला सिद्ध कारण्यासाठी विराट कोहलीकडे खूप कमी कालावधी शिल्लक आहे. विराट कोहली भारताला २०२१ टी-२० विश्वचषक, २०२२ टी-२० विश्वचषक आणि २०२३ एकदिवसीय विश्वचषकापैकी कोणत्याही एका स्पर्धेची ट्रॉफी मिळवून देऊ शकला नाही; तर त्याचे कर्णधारपद जाऊ शकते. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर विराट कोहलीचे वय ३४-३५ वर्षे होईल, अशा परिस्थितीत भारतीय संघ नवीन कर्णधाराच्या शोधात असेल. यावेळी असे ३ मजबूत भारतीय क्रिकेटपटू आहेत, जे विराट कोहलीच्या जागी भारतीय संघाचे स्थायी कर्णधार बनू शकतात.
रीषभ पंत
रीषभ पंत भारतीय संघाचा पुढील कर्णधार होऊ शकतो. पंतने गेल्या काही महिन्यांमध्ये संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे आणि याच कारणामुळे त्याचे तिन्ही स्वरुपातील संघात स्थान निश्चित झाले आहे. रीषभ पंत प्रचंड हुशार आणि चपळ खेळाडू आहे. त्याच्यामध्ये कर्णधार बनण्याचे सर्व गुण आहेत. आयपीएल २०२१मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदी असताना पंतने उत्तम कामगिरी केली आहे.
शुभमन गिल
शुभमन गिलने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण केले होते. त्या दौऱ्यावर शुभमन गिलने जगातील सर्वोत्तम गोलंदाज पॅट कमिन्सचा चांगला सामना केला आणि भारतीय संघाच्या मालिका विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. शुभमन गिलने २०१९ सालच्या देवधर ट्रॉफीमध्ये कर्णधारपद भूषवले होते. इंडिया सी संघाचा कर्णधार असताना गिलने पहिल्याच सामन्यात १४३ धावांची शानदार शतकी खेळी होती. यानंतर, इंडिया सी संघाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता. २०२३ च्या विश्वचषकानंतर शुभमन गिल भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळताना दिसण्याची शक्यता आहे.
श्रेयस अय्यर
मुंबईचा २६ वर्षीय फलंदाज श्रेयस अय्यरने २०१७ मध्ये भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. श्रेयसच्या कर्णधारपदाबद्दल बोलताना श्रेयसची आयपीएल २०१८ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर, गेल्यावर्षी आयपीएल २०२० मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत प्रवास केला होता. त्यामुळे २०२३ च्या विश्वचषकानंतर तो भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा मुख्य दावेदार असेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा ‘हा’ शिलेदार द्रविडसारखा खेळला तर इंग्लंडचा पराभव निश्चित; माजी क्रिकेटरचा छातीठोक दावा
आयपीएल फ्रँचायझींच्या चिंतेत वाढ, ‘या’ देशातील खेळाडू पहिल्या आठवड्यात नसणार उपलब्ध
बीसीसीआयच्या सीईओ पदासाठी शोधमोहीम सुरू, आयपीएल मुख्य कार्यकारी अमीनही करू शकतात अर्ज