सोमवार रोजी (०६ सप्टेंबर) लंडनच्या द केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर चाहत्यांना थरारक विजय अनुभवायला मिळाला. इंग्लंड विरुद्ध भारत संघांमध्ये झालेल्या या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यजमानांचे वर्चस्व होते. मात्र पुढे भारतीय खेळाडूंनी सांघिक खेळ दाखवत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने झुकवले आणि १५७ धावांनी विजय फत्ते केला. मैदानावरील अप्रतिम कामगिरीसह विराट कोहली अन् संघाने सर्वांची मने तर जिंकलीच; मात्र भारतीय कर्णधाराने मैदानाबाहेरील त्याच्या एका कृतीने चाहत्यांना पुन्हा एकदा आपल्या प्रेमात पाडले आहे.
कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत तो मैदानाबाहेर पव्हेलियनला जात असतानाच्या मार्गावर पडलेली पाण्याची बाटली उचलताना दिसतो आहे. मग त्यात इतकं नवल वाटण्यासारखे काय?. तर कोहलीपूर्वी इंग्लंडचा जो रूट ड्रेसिंग रूमकडे जाताना त्या बाटलीला पाहूनही दुर्लक्षित करतो आणि याच प्रसंगामुळे हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
तर होते असे की, सामना पाहण्यासाठी आलेल्या दर्शकांपैकी एकाची पाण्याची बाटली खेळाडूंच्या ड्रेसिंग रूमकडे जाण्याच्या मार्गावर पडलेली असते. इतक्यात रूट आपल्या संघ सहकाऱ्यासोबत चर्चा करत ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात असतो. तेव्हा त्याच्या पायात ती बाटली आडवी येते. पण तो बाटलीकडे दुर्लक्ष करत पुढे निघून जातो. यानंतर एक चाहता ओरडून त्याला बाटली उचलण्याची आठवणही करुन देण्याचा प्रयत्न करतो. पण ही बाब त्याच्या लक्षात येत नाही.
तेवढ्यात मैदानातून कर्णधार कोहली ड्रेसिंग रूमकडे जाण्यासाठी येत असतो. तो बाटली अशी मैदानावर पडली असल्याचे पाहून त्वरित खाली वाकून ती बाटली उचलतो आणि ड्रेसिंग रूमच्या दिशेने निघून जातो.
एका ट्वीटर वापरकर्त्याने या प्रसंगाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला त्याने ‘फरक ओळखा’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच कोहलीची एन्ट्री होताच मागे ‘स्वच्छ भारत का इरादा’ हे गाणेही जोडले आहे.
कोहलीच्या याच कृतीने कोट्यावधी क्रिकेटरसिकांची मने जिंकली आहेत. तर दुसरीकडे पाहूनही त्या बाटलीकडे दुर्लक्ष करणाऱ्या रूटवर अनेकांनी टीकेचा भडिमार केला आहे.
https://twitter.com/Yorker_Gawd/status/1435183201522118657?s=20
दरम्यान ओव्हलवरील विजयासह भारताने कसोटी मालिकेतील त्यांचा पराभव टाळला आहे. आता येता पाचवा कसोटी सामना जिंकत किंवा अनिर्णीत राखत मालिका खिशात घालण्याकडे भारताचा कल असेल. तर इंग्लंड संघ दमदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी करण्यासाठी प्रयत्नशील असेल. पाचवा आणि अंतिम कसोटी सामना १० सप्टेंबरपासून मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विवाहित, पदरी २ लेकी, तरीही पहिल्याच नजरेत धवनचा आयेशावर जडला होता जीव; वाचा इनसाईड लव्हस्टोरी
टी२० विश्वचषकासाठी गावसकरांनी निवडले १५ क्रिकेटर, दिल्ली कॅपिटल्सच्या ‘या’ धुरंधरांना नारळ
चौथ्या कसोटीतील इंग्लंडच्या दारुण पराभवानंतर संतापला माजी क्रिकेटर; म्हणाला, ‘लाज वाटते…’