इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली होती. त्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना लवकरच सुवर्णसंधी मिळू शकते. जुलैमध्ये होणाऱ्या श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार आहे. यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सलामी फलंदाजाने भारतीय संघात स्थान मिळवण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सलामीवीर फलंदाज नितीश राणा याने गेल्या काही हंगामापासून उत्कृष्ट फलंदाजी केली आहे. परंतु त्याला संघात स्थान दिले गेले नाही.अशातच आगामी श्रीलंका दौऱ्यावर त्याला दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थित संघात स्थान दिले जाऊ शकते, असा त्याला विश्वास आहे.
भारतीय कसोटी संघ जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तिथे त्यांना जून ते सप्टेंबरदरम्यान कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. तर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. याचदरम्यान जुलैमध्ये श्रीलंका दौराही भारतीय संघ करणार आहे. त्यामुळे अशी चर्चा आहे की इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या खेळाडूंना श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात येणार नाही. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह अशा दिग्गजांच्या अनुपस्थितीत श्रीलंका दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी मिळेल असे म्हटले जात आहे.
फर्स्टपोस्टच्या मते राणा म्हणाला होता की, “जर तुम्ही, मर्यादित षटकातील क्रिकेटमधील माझी गेल्या ३ वर्षातील कामगिरी पाहाल तर तुम्हाला जाणवेल की, मी प्रत्येक जागी धावा केल्या आहेत. ते आयपीएल असो किंवा देशांतर्गत होणारी क्रिकेट स्पर्धा. मला माहित आहे मला लवकरच याचे फळ मिळेल. मी माझ्या खेळात आणि जीवनात बर्याच कौशल्यांचा मानसिकरित्या समावेश केला आहे. मला वाटते आहे की गेल्या दोन ते तीन वर्षांपासून मी अधिक चांगल्या खेळामुळे आनंदी आहे. हे सुरूच राहिले पाहिजे.”
भारतीय संघात स्थान मिळवण्याची व्यक्त केली आशा
तसेच तो पुढे म्हणाला की, “माझ्या डोक्यात ही गोष्ट आहे की, माझे नाव भारतीय संघात यायला हवे. मी यासाठी तयार आहे कारण, मला वाटत आहे की, त्या यादीत माझे नाव येणार.”
त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने आतापर्यंत एकूण ३८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. यात त्याला २२०० पेक्षा अधिक धावा करण्यात यश आले आहे. तर आयपीएलच्या गेल्या काही हंगामात त्याने उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
किवी गोलंदाजांच्या आक्रमणासमोर भारताच्या दिग्गज फलंदाजांनी घातले आहे लोटांगण, पाहा चिंताजनक आकडेवारी
मजबूत जोड! ‘या’ आहेत कसोटी चॅम्पियनशिपमधील भारतीय क्रिकेटपटूंनी केलेल्या सर्वोच्च भागीदाऱ्या