कोलकाता नाईट रायडर्स आयपीएलचा 2024 चा चॅम्पियन बनला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली संघानं विजेतेपदाच्या प्रवासात डझनभर विक्रम रचले. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला या विक्रमांबद्दल सांगणार आहोत.
कोलकाता नाईट रायडर्सचा संघ सर्वात कमी सामने (3) गमावून चॅम्पियन बनला. त्यांची कामगिरी अशी होती होती की, संपूर्ण हंगामात आपल्या तुफानी फलंदाजीनं भल्याभल्यांना पाणी पाजणारा सनरायझर्स हैदराबादचा संघ अंतिम सामन्यात आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर गडगडला!
केकेआरचं हे तिसरं विजेतेपद आहे. संघानं 2012 मध्ये पहिल्यांदा आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. दोन वर्षांनी 2014 मध्ये ते पुन्हा चॅम्पियन बनले. आता तब्बल 10 वर्षांच्या वनवासानंतर केकेआरनं विजेतेपद पटकावलंय. चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स नंतर केकेआर हा आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ आहे. चेन्नई आणि मुंबईनं प्रत्येकी पाच विजेतेपद पटकावले आहेत.
केकेआरचे विजेतेपद आणि गौतम गंभीर यांच्यातील नातंही रंजक आहे. केकेआरनं गंभीरच्या नेतृत्वाखाली पहिली दोन विजेतेपदं जिंकली होती. तर तिसरं विजेतेपद मिळवलं तेव्हा गंभीर संघाचा मेंटॉर होता. आयपीएल 2024 च्या फायनलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादचा 8 गडी राखून पराभव केला. केकेआरनं आधी हैदराबादचा डाव 18.3 षटकांत 113 धावांत गुंडाळला. त्यानंतर 114 धावांचं लक्ष्य अवघ्या 10.3 षटकांत 2 गडी गमावून गाठलं. सनरायझर्सच्या एकाही फलंदाजाला 25 धावांचा पल्ला गाठता आला नाही. कर्णधार पॅट कमिन्सनं सर्वाधिक 24 धावा केल्या.
कोलकाता आणि हैदराबाद यांच्यातील अंतिम सामना अवघ्या 29 षटकांत संपला. आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासातील हा सर्वात लहान अंतिम किंवा प्लेऑफ सामन्याचा विक्रम आहे. केकेआरनं 57 चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. आयपीएल फायनलमधील हा सर्वात मोठा विजय आहे.
आयपीएल 2024 मध्ये एकूण 14 शतकं झळकावली गेली. आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक शतकांचा हा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम 12 शतकांचा होता. आयपीएल 2024 मध्ये तब्बल 41 वेळा 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्या गेल्या. एका हंगामातील सर्वाधिक 200+ धावांचा हा विक्रम आहे. याच हंगामात सनरायझर्स हैदराबादनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 287 धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक षटकार (1260) मारण्याचा विक्रमही झाला. संपूर्ण टूर्नामेंटबद्दल बोलायचे झालं तर या हंगामात एकूण 25971 धावा झाल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
केवळ गंभीरमुळे चॅम्पियन बनला नाही केकेआर, पडद्यामागे राहून ‘या’ व्यक्तीनं घडवलाय चमत्कार!
टीम इंडियाचा ‘गब्बर’ दिसणार बिग बॉस मध्ये? वैवाहिक जीवन आहे खूप वादळी
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक चौकार अन् षटकार मारणारे टॉप 5 खेळाडू, जाणून घ्या